विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी आ. शिरीष चौधरी

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सध्या सुरू असलेल्या विधीमंडळ अधिवेशनात तालिका अध्यक्षपदी आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांची निवड करण्यात आली आहे.

 

महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी संजय शिरसाट, कालिदास कोळंबकर यांच्यासह चार जणांची निवड करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज  यासंदर्भात घोषणा केली. आज जाहीर झालेल्या नावांमध्ये संजय शिरसाट (शिवसेना, संभाजीनगर पश्चिम); कालिदास कोळंबकर (भाजप- वडाळा),; मनोहर कालिकापुरे (राष्ट्रवादी, अर्जुनी-मोरगाव) आणि  शिरीष चौधरी (कॉंग्रेस, रावेर-यावल) यांची तालिका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

 

विधीमंडळ अधिवेशन सुरू असतांना विधानसभा अध्यक्षांच्या अनुपस्थितीत सभागृहाचे कामकाज पाहण्याची जबाबदारी तालिकाध्यक्षांवर असते. प्रत्येक अधिवेशनात तालिकाध्यक्षपदी विविध आमदारांचे अनुभव आणि ज्येष्ठतेनुसार संबंधित पक्षाचे विधिमंडळ नेते शिफारस करत असतात. त्यानुसार ही निवड होत असते. यानुसार जळगाव जिल्ह्यातून यासाठी आमदार शिरीष चौधरी यांची निवड करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे त्यांचे पिताश्री दिवंगत मधुकरराव चौधरी यांनी पाच वर्षे विधानसभाध्यक्षपदाची जबाबदारी अतिशय समर्थपणे सांभाळलेली आहे. यानंतर शिरीषदादांना तालिका अध्यक्षपदाचा बहुमान मिळाला आहे.

Protected Content