मोक्षप्राप्तीसाठी तिघांच्या आत्महत्या !

 

शहापूर ( ठाणे ) : वृत्तसंस्था । तालुक्यातील खर्डीजवळील चांदा गावात तीन जणांचे मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली होती. त्यांनी जंगलात झाडाला गळफास घेतला होता. या तिघांनी मोक्ष मिळावा म्हणून आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे

एका गुराख्याला तिघांचे मृतदेह आढळून आले होते. वेगवेगळे कयास लावले जात असताना घटनेमागील नेमकं कारण समोर आलं आहे.

१४ नोव्हेंबरपासून नितीन भेरे (रा. शहापूर), महेंद्र दुभेले (रा.चांदा ३०, खर्डी) व मुकेश घायवट ( रा. चांदा २२, खर्डी) हे तिघे अचानक बेपत्ता झाले होते. सर्वत्र तपास करूनही त्यांचा शोध न लगल्याने त्यांच्या नातेवाईकांनी १७ नोव्हेंबर रोजी शहापूर व खर्डी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती.

त्यानंतर शहापूरच्या जंगलात चांदा गावातील रूपेश सापळे या गुराख्याला एका झाडाला तीन लटकलेले मृतदेह दिसून आले होते. या तिघांनी एकाच साडीने गळफास घेतला होता. मृतदेह आढळून आलेल्या ठिकाणी दारूच्या बाटल्या आणि इतरही काही वस्तू आढळून आल्या होत्या. गुराख्यानं याची माहिती खर्डी पोलिसांना दिली. त्यानंतर तिघांची ओळख पटवण्यात आली.

नितीन याला मंत्र-तंत्राचं आकर्षण होतं. ते तिघेही बऱ्याच वेळा धार्मिक ठिकाणी एकत्र यायचे. अमावस्येला मृत्यू आल्यास मोक्ष मिळतो, या अंधश्रद्धेतूनच तिघांनी गळफास घेऊन जीवन संपवल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

Protected Content