मुक्ताईनगरात विद्यार्थीनीला बसने उडविले !

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरात स्टेट बँकेजवळ बसने एका विद्यार्थीनीला उडविल्याने ती जखमी झाल्याचे वृत्त आहे.

या संदर्भातील माहिती अशी की, आज सकाळी शहरातील स्टेट बँकेजवळ १२ वर्षाच्या मुलीस बसने धडक दिली. यात त्या मुलीच्या सायकलीचा चक्काचूर झाला असून विद्यार्थीनी जखमी झाली आहे. या संदर्भातील माहितीनुसार एमएच १४ बीटी ४१० या क्रमांकाची शेगाव ते नवापूर बस ही वेगाने जात असतांना ऋतुजा राजेंद्र कोल्हे या विद्यार्थीनीला बसने धडक दिली. यात सदर विद्यार्थीनीची सायकल पूर्णपणे चक्काचूर झाली असून ऋतुजा जखमी झाली आहे. तिला उपचारासाठी रूग्णालात दाखल करण्यात आले आहे.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन ऋतुजाला तात्काळ रूग्णालयात पाठविले. मुक्ताईनगरात बेशीस्त वाहतुकीचा अक्षरश: कळस झाला असून रस्त्यात कुणी कसेही वाहन उभे करतो. यामुळे नेहमी ट्रॅफीक जाम होत असते. यातच नगरपंचायतीने शहरात कुठेही गतीरोधक उभारलेले नसल्याने अनेकदा लहान-मोठे अपघात होत असतात. याच प्रकारे आज विद्यार्थीनीचा अपघात झाल्याने परिसरातून संतापाची लाट उसळली आहे.

दरम्यान, संबंधीत बस ही नवापूर आगाराची असल्याची माहिती मिळाली आहे. या संदर्भात शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा मुक्ताईनगर पोलिसात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते.

Protected Content