मेहरूण शिवारात अवैध वाळूचा साठा जप्त; १७ लाख २३ हजारांचा दंड

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील मौजे मेहरूण शिवारातील औद्योगिक वसाहत परिसरात आढळुन आलेल्या 80 ब्रास वाळुच्या अवैध साठ्याप्रकरणी प्लॉट मालकाला 17 लाख 23 हजार 800 रूपयांच्या दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान संबंधित प्लॉट मालकास 7 दिवसात खुलासा सादर करण्याचे आदेश तहसीलदार नामदेव पाटील यांनी दिले आहे.

याबाबत माहिती अशी की, दि. 27 जुलै रोजी अनिल चंद्रभान पाटील व चेतन कृष्णा पाटील यांच्या मे. सी.के. प्रोडक्ट या औद्योगिक वसाहतीमधील कंपनीच्या डी सेक्टर प्लॅट नं. 34 मध्ये 80 ब्रास वाळुचा मोठ्याप्रमाणावर अवैध साठा केल्याचे आढळुन आले होते. यासंदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार करून चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार मेहरूण तलाठी यांना तपासणीचे आदेश देण्यात आले होते. तलाठी व मंडळ अधिकार्‍यांनी केलेल्या तपासणीचा अहवाल तहसीलदार नामदेव पाटील यांना सादर केला होता. अहवालाअंती प्लॉट धारक अनिल चंद्रभान पाटील व चेतन कृष्णा पाटील यांना नोटीस बजावून खुलासा मागविण्यात आला होता. त्यांनी पावत्यांसह खुलासा सादर केला. मात्र पावत्यांवर गौणखनिज टाकण्याचे ठिकाण व प्रत्यक्ष वाळुचा साठा असलेले ठिकाण यात विसंगती आढळल्याचे तहसीलदारांच्या निदर्शनास आले. त्यामुळे हा साठा अवैध असल्याचे ग्राह्य धरीत तहसीलदार नामदेव पाटील यांनी अनिल चंद्रभान पाटील व चेतन कृष्णा पाटील यांना महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 48(7) मधील तरतुदीनुसार गौणखनिजाचे अवैध उत्खनन व वाहतुकीपोटी 17 लाख 23 हजार 800 रूपये दंडाची नोटीस बजावली आहे. तसेच 7 दिवसाच्या आत खुलासा सादर करण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले आहे.

Protected Content