जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मेहरूण परिसरात असलेल्या महादेव मंदिराजवळील दूध डेअरीचे दुकान फोडून दुकानातील साडेसात हजाराची रोकड आणि मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना मंगळवार ७ मार्च रोजी सकाळी ७.३० उघडकीला आली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोनम रवींद्र पाटील (वय-२६, रा. रामेश्वर कॉलनी) या पत्रकारिता करून आपला उदरनिर्वाह करतात. शिवाय त्यांच्या वडिलांचे मेहरून परिसरातील महादेव मंदिराजवळ विकास दुधाची टपरी आहे. त्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. सोमवार ६ मार्च रोजी दुपारी १.३० वाजता दुधाचे दुकान बंद करून नातेवाईकांकडे लग्नाच्या कार्यासाठी निघून गेले. दरम्यान मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बंद दुधाचे टपरी फोडून दुकानात ठेवलेले रोकड व चिल्लर असा एकूण ७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार मंगळवार ७ मार्च रोजी सकाळी साडेसात वाजता समोर आला. यावेळी सोनम पाटील व रवींद्र पाटील यांनी दुकानात जाऊन पाहणी केली असता चोरट्यांनी टपरीचे कुलूप तोडून आत प्रवेश केला होता. सामानांची अस्तव्यस्त केल्याचे दिसून आले. यानंतर सोनम पाटील यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर सायंकाळी ५ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल नितीन पाटील करीत आहे.