मेकअप, टाईट जीन्स नकोच ’, पाकिस्तानात नवं फर्मान !

 

इस्लामाबाद : वृत्तसंस्था । पाकिस्तानात हजारा विद्यापीठानं जारी केलेल्या नियमावलीनुसार विद्यार्थ्यांना जीन्स, टी-शर्ट, हाफ जीन्स आणि मेकअप करुन विद्यापीठात येण्यास मनाई करण्यात आली आहे.

पाकिस्तानच्या खैबर फख्तूनख्वा प्रांतातील हजारा विद्यापीठानं विद्यार्थी आणि शिक्षक, प्राध्यापकांसाठी ड्रेस कोड लागू केला आहे. विद्यापीठानं मुलींना जीन्स, स्लिवलेस शर्ट आणि टी-शर्ट घालण्यास बंदी केली आहे. तर मुलांना बाळी घालणं आणि मोठे केस ठेवण्यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. विद्यार्थ्यांसह प्राध्यापक आणि प्राध्यापिकांनाही हा नियम लागू करण्यात आला आहे. पाकिस्तान सरकारनं या निर्णयाबाबत विद्यार्थी अभ्यासाकडे जास्त लक्ष देतील, अशी अजब प्रतिक्रिया दिली आहे

विद्यापीठानं जारी केलेल्या नियमावलीनुसार विद्यार्थ्यांना जीन्स, टी-शर्ट, हाफ जीन्स आणि मेकअप करुन विद्यापीठात येण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर महागड्या हँडबॅग घेऊन आणि अलंकार घालून विद्यापीठात येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी फक्त शॉल, अबाया किंवा सलवार-कमीज अशा साध्या पेहरावात विद्यापीठात येण्यास सांगितलं आहे.

प्रशासनानं विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना शॉर्ट्स, चप्पल, मोठे केस, पोनीटेल, कानात बाळी घालण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्याचबरोबर सभ्यरितीनं दाढी ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मुलांनी आणि शिक्षकांनी फक्त पॅन्ट-शर्ट किंवा कुर्ता-पायजमा घालण्यास प्राधान्य द्या, असंही विद्यार्थ्यांना सुचवण्यात आलं आहे. याबाबत पाकिस्तानात सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. अनेकांनी विद्यापीठ आणि सरकारच्या या निर्णयावर जोरदार टीकाही केलीय.

विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावं यासाठी ड्रेस कोड लागू करण्यात आल्याचं खैबर पख्तूनख्वा सरकारचे प्रवक्ते कामरान बांगश यांनी म्हटलंय. विद्यार्थ्यांच्या ड्रेस कोड बाबत विद्यापीठांनाच सर्व अधिकार देण्यात आले आहेत. हा निर्णय गरीब आणि श्रीमंत विद्यार्थ्यांमधील दरी कमी करतानाच, त्यांच्यातील आणि शिक्षकांमधील स्पर्धा संपवेल, असंही बांगश यांनी म्हटलंय.

Protected Content