जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मूळजी जेठा महाविद्यालयामध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यशास्त्र विभाग आणि विद्यार्थी विकास विभाग, क.ब.चौ.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने दि.7 रोजी एकदिवसीय विद्यापीठस्तरीय युवा संसद कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना भारतीय लोकशाहीचा कणा असलेली संसदीय कार्यप्रणाली प्रत्यक्ष अनुभवता यावी, त्यातून सुजाण आणि प्रगल्भ तरुण पिढी निर्माण व्हावी, त्यांनी देशाच्या लोकशाही आणि संसदीय प्रणालीमध्ये सुयोग्य राजकीय नेतृत्व करून देशाच्या लोकशाहीला अधिक मजबूत करावे, याकरिता सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेचे उद्घाटन जळगाव लोकसभेचे खासदार उन्मेष पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सं.ना.भारंबे असतील. तसेच क.ब.चौ.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव चे मानव्यविद्या शाखेचे प्रभारी अधिष्ठाता प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील आणि विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक डॉ.सुनील कुलकर्णी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील.
कार्यशाळेत डॉ.संतोष खत्री, प्रमुख, राज्यशास्त्र विभाग, विद्यावर्धिनी महाविद्यालय यांचे संसदीय कार्यप्रणाली विषयावर प्रशिक्षण सत्र होईल. त्याचप्रमाणे डॉ.जयेश पाडवी आणि डॉ.राजीव पवार, राज्यशास्त्र विभाग मू,जे. महाविद्यालय हे अभिरूप संसदेसाठी विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण घेतील आणि निवड करतील. तसेच कार्यशाळेत सुमारे २ तासाचे अभिरूप संसद सत्र आयोजित करण्यात येईल.
या कार्यशाळेच्या समारोपाला राज्यशास्त्र अभ्यासमंडळाचे प्रभारी अध्यक्ष डॉ.विजय तुंटे, समाजिक शास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा.देवेंद्र इंगळे, भाषा प्रशाळेचे संचालक डॉ.भूपेंद्र केसुर हे प्रमुख पाहुणे असतील. या कार्यशाळेमध्ये क.ब.चौ.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव परिक्षेत्रातील सुमारे ८० विद्यार्थी सहभागी होणार आहेत, अशी माहिती युवा संसद कार्याशाळेचे संयोजक आणि राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.जयेश पाडवी यांनी दिली आहे.