मूकपाट येथील पाणी पुरवठा योजनेचे गुलाबभाऊंच्या हस्ते भूमिपुजन !

 

एरंडोल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | पाणी पुरवठा खात्यातर्फे राज्यातील २२ हजार योजनांना मंजुरीचा विक्रम आपल्या खात्याच्या माध्यमातून झाला असून याद्वारे अगदी लहान गावे आणि वाडी-वस्त्यांपर्यंत पिण्याचे शुध्द पाणी पुरवठा करण्याला वेग आलेला आहे. या अनुषंगाने गालापूर – मूकपाट ग्रुप ग्रामपंचायतीच्या अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे भूमिपुजन करण्यात आले असून याच्या मदतीने ग्रामस्थांची तहान भागणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.

ते मुकपाट (पद्मालय) येथे पाणी पुरवठा योजनेच्या भूमिपुजनानंतर बोलत होते. तर याच परिसरातील ख्यातनाम असणार्‍या पद्मालय देवस्थानाला ‘ब’ वर्गाचा दर्जा मिळवून देणार असून याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती देखील ना. गुलाबराव पाटील यांनी दिली.

एरंडोल तालुक्यातील गालापूर – मूकपाट ग्रुप ग्रामपंचायतीच्या अंतर्गत आज मुकपाट येथे पाणी पुरवठा योजनेचे भूमिपुजन शिवसेनेचे नेते तथा राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना उपनेते तथा आमदार चिमणराव पाटील होते.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शेतकी संघाचे माजी अध्यक्ष पोपटराव चव्हाण, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन पवार, मागासवर्गीय सेनेचे जिल्हाप्रमुख मुकुंदराव नन्नवरे, वरखेडीचे सरपंच संतोष पाटील, पिंप्रीचे बबन पाटील; आनंदनगरचे गजानन राठोड, मालखेडेचे माजी सरपंच मुकुंदा पाटील, टोळी येथील सरपंच बाळा पाटील, पांडुरंग पाटील, विजय माळी, अशोक पाटील, ठेकेदार शांताराम पाटील, ताडे येथील सरपंच सचिन पाटील, जावेद मुजावर, चंद्रभान पाटील, बबलू पाटील, संगायोचे शरद ठाकूर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

प्रास्ताविक आरीफ शेख यांनी केले. त्यांनी मूकपाट गावासाठी पाणी पुरवठा योजना मंजूर केल्याबद्दल ना. गुलाबराव पाटील यांचे आभार मानले. आमदार चिमणराव पाटील यांनी मतदारसंघात विविध विकासकामांना गती आली असल्याचे सांगितले.

गालापूर-मूकपाट ग्रुप ग्रामपंचायतीच्या अंतर्गत फुलपाट येथे ६० लक्ष रूपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. यात मुखपाट तलावाच्या शेजारी पाण्याचा मुख्य स्त्रोत असणारी विहिर तयार करण्यात आलेली आहे. येथून सुमारे दीड किलोमीटरच्या पाईपलाईनद्वारे पाणी गावातील ४० हजार लीटर क्षमतेच्या जलकुंभात आणले जाणार असून ते ग्रामस्थांना थेट आपल्या नळातून मिळणार आहे.

ना. गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणातून जलजीवन मिशनच्या माध्यमातून राज्यभरात सर्वच ठिकाणी पाणी पुरवठा योजनांना गती मिळाली असल्याचे नमूद केले. यात नवीन निकषांच्या माध्यमातून वाढीव पाणी मिळणार आहे. पाणी पुरवठा खात्याच्या तत्पर कामाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले असून भविष्यात देखील याच प्रकारे गतीमान कामे होत राहतील अशी ग्वाही ना. गुलाबराव पाटील यांनी दिली.

दरम्यान, हा कार्यक्रमा आधी ना. गुलाबराव पाटील यांनी उपस्थित मान्यवरांसह पद्मालय येथील श्रीगणेशाचे दर्शन घेतले. या ठिकाणी देवस्थानाचे विश्‍वस्त, पुजारी आणि भाविकांनी त्यांचे स्वागत केले.

याप्रसंगी झालेल्या अनौपचारीक चर्चेत ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, पद्मालय देवस्थानाला ‘ब’ वर्गाच्या तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा यासाठी आपण आधीच शासन दरबारी प्रस्ताव पाठविलेला असून याचा पाठपुरावा सुरू आहे. हा दर्जा लवकरच मिळणार आहे. तर, देवस्थानाच्या विकासासाठी तीर्थक्षेत्र ग्रामविकास अथवा पर्यटन यातून किमान पाच कोटी रूपयांचा निधी मिळवून देण्यासाठी आपण कटीबध्द असल्याचे आश्‍वासन देखील ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामसेवक रमेश पवार यांनी केले. तर गालापूरचे सरपंच विनोद महाजन यांनी आभार मानले.

Protected Content