मुख्याधिकारी पदी होणार विराजमान अर्चना राजपूत !

अमळनेर-गजानन पाटील | अमळनेर प्रताप महाविद्यालयातुन पदवी आणि पदव्युत्तर चे शिक्षण पूर्ण केलेल्या अर्चना संदीप राजपूत हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०२१ च्या परीक्षेत उल्लेखनीय यश तीने संपादन केल्याने नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी तिची नियुक्ती होणार आहे.

 

अर्चना राजपूत हिने एमपीएससीत यश मिळवले असून तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. सामान्य कुटुंबात जन्माला येऊन वडील एस टी महामंडळात वाहक पदावर असताना तीने अत्यंत जिद्द आणि कठोर मेहनतीतुन हे यश संपादन केले आहे.दिलेल्या परीक्षेत संपूर्ण महाराष्ट्रात मुलींमधून ५१ व्या क्रमांकावर तीची निवड झाली आहे.

 

मूळची नगरदेवळा येथील रहिवासी असलेल्या अर्चनाने शालेय शिक्षण नगरदेवळा येथील सरदार एस. के.  पवार हायस्कूल येथे पूर्ण केले. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी अमळनेर प्रताप महाविद्यालयात ती दाखल झाली होती. येथे केमिस्ट्री विषयात पदवीचे शिक्षण तिने पूर्ण केले. त्यानंतर राज्यशास्त्र विषयात एम. ए. (पदव्युत्तर)चे शिक्षण देखील अमळनेर प्रताप महाविद्यालयातुनच पूर्ण केले. लहान पणापासूनच वक्तृत्वामध्ये विशेष आवड असताना अमळनेर प्रताप महाविद्यालयामुळे तीला अनेक वक्तृत्व व वादविवाद स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली. अनेक राज्यस्तरीय स्पर्धा तीने गाजवून पारितोषिक मिळविल्याने प्रताप महाविद्यालयाचे नावही उज्वल झाले. महाविद्यालयात कोणत्याही उपक्रमात ती मागे नव्हती.  इयत्ता ८ वी पासूनच राजपत्रित अधिकारी होण्याचे तिचे स्वप्न असल्याने सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनेच तिने पदवी शिक्षणासाठी प्रताप महाविद्यालयाची निवड केली होती.

 

अमळनेरात पदव्युत्तर शिक्षण झाल्यानंतर आपले अंतिम ध्येय साध्य करण्यासाठी ती पुणे येथे पोहोचून स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागली होती. दरम्यानच्या काळात सोनी मराठी वाहिनीवरील कोण होणार करोडपतीच्या हॉटसीट वर देखील ती पोहोचल्याने तेव्हाही ती प्रकाशझोतात आली  होती. दरम्यान तीचे ध्येय अत्यंत कठीण असले तरी जिद्द आणि प्रचंड मेहनतीची तिची तयारी असल्याने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या २०२१ परीक्षेत तिने यशाला गवसणी घातली आणि त्यानंतर नुकत्याच प्राप्त झालेल्या आदेशानुसार मुख्याधिकारी पदावर तिची निवड निश्चित झाली आहे. लवकरच नागपूर येथे प्रशिक्षण घेण्यासाठी ती रवाना होणार आहे. सदर यशाबद्दल अमळनेर खा. शि. मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ अनिल शिंदे,कार्योपाध्ययक्ष प्रदीप अग्रवाल,सर्व संचालक मंडळ,प्रताप चे प्राचार्य डॉ ए बी जैन आणि सर्व प्राध्यापक वृंदानी तीचे अभिनंदन केले आहे.

 

तिन्ही बहिणी अत्यंत गुणी

 

वाहक संदीप राजपूत यांना मुलगा नसून तिन्ही मुली अत्यंत गुणी आहेत,मोठी मुलगी नम्रता राजपुत मालेगाव येथे वीज वितरण कंपनीत सहा अभियंता आहे. तर लहान मुलगी मोहिनी राजपुत चे शिक्षण देखील अमळनेर प्रताप महाविद्यालयात झाले असून तीने एल. एल. बी. पूर्ण करून आता मुंबई येथे एल. एल. एम. करीत आहे,अत्यंत गुणी असल्याने या तिन्ही बहिणी समाजात आदर्श ठरत आहेत.

 

सर्वांगीण विकासासाठी प्रताप महाविद्यालय उत्तम

 

आपल्या यशाच्या संदर्भात अर्चना राजपूत म्हणाल्या की, सामान्य कुटुंबातील असल्याने अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्रातील महागड शिक्षण परवडणार नव्हत. त्यामुळेच पदवीचे शिक्षण घेऊन अधिकारी होण्याचं ठरवलं होतं. आणि तशी माझी मनापासून इच्छा स्वप्न देखील होती. अमळनेरच्या प्रताप महाविद्यालया बाबत खूप काही ऐकले असल्याने या महाविद्यालयाची निवड मी केली. तेथे खूप काही शिकयला मिळाले आणि अनेक संधीही मिळाल्या,म्हणून सर्वांगीण विकासासाठी प्रताप महाविद्यालय उत्तम व्यासपीठच आहे. खरंतर स्पर्धा परीक्षांचा प्रवास म्हणजे ती आपल्या संयमाचीची परीक्षा असते. स्वतःच्या क्षमतांवर पूर्ण विश्वास हवा आणि अभ्यासात सातत्य ठेवल्यास यश नक्कीच मिळते आणि अभ्यासाला पर्यंत फक्त अभ्यासच असतो,त्यामुळे हेच एक सुत्र मी लक्षात ठेवले तसेच इतर परीक्षार्थीनी लक्षात ठेवावे.

Protected Content