औरंगाबाद (वृत्तसंस्था) कोरोनाचे संकट राज्यात सर्वत्र पसरल्याने मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक जिल्ह्यात जाण्यात अर्थ नाही. त्यांनी एकाच ठिकाणी बसून सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवणे अधिक गरजेचे आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पाठराखण केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमी खासदार शरद पवार हे राज्यातील विविध जिल्ह्यांचे दौरे करत आहेत. आज ते औरंगाबाद दौऱ्यावर होते. कोरोना पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरात बसूनच काम करतात, ते बाहेर पडत नाही, असा आरोप काही दिवसांपासून विरोधकांकडून होत आहे. यावर उत्तर देतांना यावेळी पवार म्हणाले की, आताचे संकट हे राज्यात सर्वदूर पसरले आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी बसून काम करणे जास्त गरजेचे आहे. जेणेकरून सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवता येईल. मी मुंबईला परतल्यावर येथील सर्व गोष्टींची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री निर्णय घेतील, असेही शरद पवार यांनी सांगितले. एवढेच नव्हे तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही कामगिरी चांगली आहे. करोनाच्या संकटावर, रुग्णसंख्येवर ते व्यवस्थित लक्ष ठेवून आहेत, असेही पवार म्हणाले.