मुक्ताईनगर तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून द्यावा; रोहीणी खडसे-खेवलकर यांची मागणी

मुक्ताईनगर प्रतिनिधी । संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृद्धपकाळ योजना,श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेचा पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून द्यावा या मागणीचे निवेदन रोहिणी खडसे-खेवलकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, समाजातील अंध, अपंग विधवा, परितक्ता, निराधार व्यक्तीना मदत म्हणून शासनातर्फे संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृद्धपकाळ योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजना याद्वारे मासिक वेतन देऊन मदत दिली जाते. सदर योजनांच्या पात्र लाभार्थ्यांच्या प्रकरणाला मंजुरी मिळुन लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळावा, यासाठी तालुकास्तरावर एक समिती स्थापन केलेली असते त्याचे सचिव हे तहसीलदार असतात परंतु गेल्या एक वर्षापासून सदर समिती स्थापन केली गेली नसल्याने तसेच निवडणुक आचारसंहिता, कोरोना महामारी या बाबी मुळेनविन प्रकरणाना मंजुरी मिळत नसल्यामुळे मुक्ताईनगर तालुक्यातील तसेच इतर तालुक्यातील या योजनांचे नविन पात्र लाभार्थी या योजनेच्या लाभा पासून वंचित राहत आहेत.

गेल्या सात महिन्यांपासून लॉकडाऊन असल्यामुळे कुठलाही रोजगार उपलब्ध नाही व या योजनांचा लाभ सुद्धा मिळत नाही आहे, त्या कारणाने याअंध, अपंग विधवा, परितक्ता, निराधार व्यक्तिवर उपासमारीची पाळी आली आहे. म्हणून समिती स्थापन नसली तरी तहसीलदार यांना पात्र लाभार्थ्यांच्या प्रकरणाला मंजुरी देण्याचे अधिकार आहेत हि बाब लक्षात घेऊन मुक्ताईनगर तालुक्यातील ज्या लाभार्थ्यांनी सदर योजनेच्या मंजुरी साठी तहसील कार्यालयाकडे प्रकरण केलेले आहे त्यातील पात्र लाभार्थ्यांचे प्रकरणास आपल्या स्तरावर कार्यवाही करून मंजुरी देण्यात यावी.

व आतापर्यंत मंजुर असलेल्या सदर योजनांच्या लाभार्थ्यांना गेल्या काही महिन्यांपासून सदर योजनेचे वेतन मिळाले नाही आहे ते त्वरित देण्यात येऊन या योजनेतील लाभार्थी असलेले अंध, अपंग विधवा, परितक्ता, निराधार व्यक्तीवर आलेली उपासमारीची वेळ दुर करावी यासाठी शाम वाडकर तहसीलदार मुक्ताईनगर यांना जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांनी निवेदन दिले. यावेळी पं. स. सभापती विद्या पाटील, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, माजी पं.स. सभापती राजुभाऊ माळी,प स सदस्य राजेंद्र सवळे,प्रदीप साळुंखे,चंद्रकांत भोलाने, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अंकुश चौधरी, माजी जि प सदस्य सुभाष पाटील, सुनिल काटे,निलेश मालवेकर,शिवराज पाटील, विनोद पाटील उपस्थित होते.

कोट-
शासनाच्या संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृद्धपकाळ योजना,श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजना या योजनांच्या तालुका स्तरावरील समित्या गठित करण्यात आल्या नसल्याने पात्र लाभार्थ्यांना या योजनाचा लाभ मिळत नाही आहे. समिती स्थापन नसली तरी तहसिलदार यांना या प्रकरणांना मंजुरी देण्याचे अधिकार आहेत त्यांनी त्यांचे अधिकार वापरून या पात्र* प्रकरणांना मंजुरी देऊन लाभार्थ्यांना लाभ मिळवून देऊन त्यांच्यावर आलेली उपासमारीची वेळ दुर करावी व मंजूर असलेल्या लाभार्थ्यांचे वेतन तत्काळ त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे. यासाठी तहसीलदार यांना निवेदन दिले. त्यांनी यावर तत्काळ कारवाई करून येत्या आठवडा भरात प्रकरण निकाली काढतो असे आश्वासन दिले.

– रोहिणी खडसे खेवलकर, अध्यक्ष, जळगाव जिल्हा सह मध्यवर्ती बँक

Protected Content