मुंबईत महापौर भाजपचाच : आ. प्रसाद लाड

 

 

मुंबई प्रतिनिधी । मुंबई महापालिकेत भाजप व मनसेची युती होण्याची चिन्हे असतांनाच आज राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मुंबईत भाजपचाच महापौर होणार असल्याचा दावा केला आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटर्तीय आमदार प्रसाद लाड यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. ठाकरे यांच्या भेटीनंतर प्रसाद लाड यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसंच मुंबई महानगरपालिकेत भाजपचाच महापौर बसेल आणि योग्य वेळी योग्य उत्तर दिलं जाईल, असं सूचक विधानही केलं. शिवसेनेची परंपरागत असलेली सत्ता आम्ही काढून घेणार आहोत. त्याच्यासाठी जे लोकं आमच्यासोबत येतील त्यांना आम्ही सोबत घेऊ. मनसेसोबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. आजची भेट ही केवळ वैयक्तीक आणि मैत्रीची भेट होती. राज ठाकरे यांच्या हाताला दुखापत झाल्याची माहिती मिळाली होती, त्यामुळेच त्यांची भेट घेतली, असं प्रसाद लाड म्हणाले.

भाजपचा महापालिकेत महापौर बसेल आणि भाजपचाच झेंडा महापालिकेवर फडकेल हे मी आत्मविश्‍वासानं सांगत आहे. अद्याप महापालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या नाही. जी काही गणितं आहेत ती महापालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्यावरच होत असतात. त्यामुळे मी योग्य वेळी योग्य उत्तर देईन, असंही लाड म्हणाले.

Protected Content