काँग्रेसच्या अपयशी प्रदेशाध्यक्षांनी राजीनामे द्यावे – चव्हाण

1240022 Wallpaper2

मुंबई (वृत्तसंस्था) लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरू झाले असून माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. देशात जिथे-जिथे काँग्रेसला अपयश आलंय, तेथील सर्व प्रदेशाध्यक्षांनी राजीनामे द्यावेत, असे मतही त्यांनी मांडले आहे.

 

लोकसभा निवडणुकीत देशभरात काँग्रेसची पीछेहाट होत असताना महाराष्ट्रातही काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची धूळधाण उडाली. काँग्रेसला केवळ एक जागा मिळाली. अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला. खुद्द अशोक चव्हाण यांचा नांदेड लोकसभा मतदारसंघात धुव्वा उडाला. भाजपच्या प्रतापराव चिखलीकरांनी त्यांचा ४० हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. निकालानंतर आज प्रथमच अशोक चव्हाण यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन पुढील भूमिका मांडली. पराभवाची जबाबदारी म्हणून प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. अन्य राज्यांतील प्रदेशाध्यक्षांनीही हीच भूमिका घ्यावी, जेणेकरून आगामी निवडणुकांच्या दृष्टीने पक्षाला तयारी करता येईल. तरुण नेत्यांना संधी देता येईल,’ असेही चव्हाण यावेळी म्हणाले.

अशोक चव्हाण यांनी राहुल यांच्या राजीनाम्यावर भाष्य केलं. ‘काँग्रेसच्या पराभवाला राहुल गांधी जबाबदार आहेत, असे म्हणणे चूक आहे. देशात सर्व ठिकाणी पक्षाचा पराभव झाला आहे. त्याची कारणमीमांसा पुढं होईलच. मात्र, राहुल गांधी यांनी राजीनामा देऊ नये व दिला तरी स्वीकारला जाऊ नये, अशी भूमिकाही चव्हाण यांनी मांडली.

वंचित बहुजन आघाडीमुळे महाराष्ट्रात आम्हाला मोठे नुकसान झाले आहे. आमचे ९ ते १० उमेदवार त्यांच्यामुळे हारले आहेत, अशी कबुलीही चव्हाण यांनी दिली. ‘प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी ही भाजपची ‘बी’ टीम आहे,’ असा आरोपही अशोक चव्हाण यांनी केला. नारायण राणे हे काँग्रेसमध्ये परतणार असल्याचीही चर्चा आहे. त्याबद्दल विचारले असता, याबद्दल मला माहीत नसल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

Add Comment

Protected Content