‘एक शरद बाकी गारद’ हे बाळासाहेबांनी म्हटले होते, फडणवीसांना अभ्यासाचा बेस पक्का करावा लागेल

 

मुंबई (वृत्तसंस्था) देवेंद्र फडणवीस राजकारणात नव्हते, तेव्हा स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी ‘एक शरद बाकी गारद’ या शीर्षकाखाली अग्रलेख लिहिला होता. त्यामुळे फडणवीस यांना अभ्यासात थोडा बेस पक्का करावा आणि मग बोलावे, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

 

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची प्रदीर्घ मुलाखत घेतली आहे. त्या मुलाखतीचं ‘एक शरद बाकी गारद’ असे शीर्षक असलेल्या मुलाखतीचा प्रोमो दोन दिवसांपूर्वीच शेअर केला होता. यावरुन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुलाखतीला शिवसेना नेते संजय राऊत यांनी ‘एक शरद बाकी गारद’ऐवजी, ‘एक नारद बाकी गारद’ असे शीर्षक द्यायला हवे होते, असा टोला लगावला होता. ‘बाकी सर्व गारद असतील, तर उद्धव ठाकरेही गारद आहेत का?’ असा बोचरा सवाल फडणवीसांनी विचारला होता. त्यावर आज संजय राऊत यांनी प्रतिहल्ला केला आहे. राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस राजकारणात नव्हते, त्याआधी शरद पवार यांच्या राजकीय झंझावातावर बाळासाहेब ठाकरे यांनी मार्मिकमध्ये अग्रलेख लिहिला होता, त्याचे हे शीर्षक होते. खरंतर बाळासाहेबांनी त्यावेळी दोन शरदांविषयी लिहिले होते, दुसरे शरद म्हणजे शरद जोशी. त्यामुळे त्यांनी ‘दोन शरद सगळे गारद’ असे म्हटले होत. आता एक शरद नाहीत, त्यामुळे राहिले एकच शरद. त्यामुळे त्यांना अभ्यासात थोडा बेस पक्का करावा लागेल. हे बाळासाहेबांचे वाक्य आहे, पवारांविषयी म्हटलेलं. तेव्हा ते राजकारणात नव्हते. आम्ही बाळासाहेबांसोबत काम करत होतो, असे राऊत यांनी सांगितले.

Protected Content