मुंबईतील काही भागांमध्ये लॉकडाउन लागू करा ; पोलिसांचा महापालिकेला प्रस्ताव

मुंबई (वृत्तसंस्था) कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव आणि लॉकडाउनच्या नियमांचा सातत्याने होत असलेला भंग लक्षात घेता मुंबई पोलिसांनी काही भागांमध्ये लॉकडाउन लागू करण्याचा प्रस्ताव महापालिकेसमोर ठेवला आहे. मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मात्र हे शक्य नसल्याचे म्हटले आहे.

मुंबई पोलीस आणि महापालिका अधिकाऱ्यांची शुक्रवारी आढावा बैठक पार पडली. या बैठकीत मुंबई पोलिसांनी गोरेगाव ते दहिसरदरम्यान चार भागांमध्ये लॉकडाउन पुन्हा लागू करण्याचा प्रस्ताव ठेवला. परंतू महापालिका अधिकाऱ्यांनी मात्र सध्या लॉकडाउन लागू करणे शक्य नसल्याचे म्हटले आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ जून ते १८ जून दरम्यान शहरात ५९१ गुन्हे दाखल करण्यात आले असून एकट्या उत्तर मुंबईत ४३१ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. दहिसर, समता नगर, कांदिवली पोलीस स्टेशन येथे सर्वात जास्त गुन्हे दाखल झाले आहेत. मास्क न घालणे, मर्यादेपेक्षा जास्त वेळ दुकान सुरु ठेवणे, दुचाकीवरुन दोघांनी प्रवास करणे याप्रकरणी हे गुन्हे दाखल आहेत. तर कोरोनाचे रुग्ण संख्या वाढायला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे.

Protected Content