मी एक चांगला सहकारी गमावला : एकनाथराव खडसे

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष वाढावा म्हणून हरिभाऊंनी खूप काम केले. आज जो भारतीय जनता पक्ष जिल्ह्यात वाढला त्यात हरीभाऊंचा खूप मोलाचा वाटा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक ते भाजपाचे खासदार, आमदार, नामदार, जिल्हाध्यक्ष हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. मी एक चांगला सहकारी गमावला, अशी भावूक प्रतिक्रिया माजी पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांच्या निधनानंतर व्यक्त केली आहे.

 

जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी विशेषतः केळी उत्पादकांच्या हितासाठी ते सदैव लढत राहिले. कृषी संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी सातत्याने शेतकऱ्यांच्या भल्यासाठी प्रयत्न केले. राजकीय क्षेत्रात राहून, समाजकारण कसे करावे हे अनेकांना शिकवले जळगाव जिल्ह्यातील जनतेशी त्यांनी सातत्याने संपर्क ठेवला. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या मनात कधीच अहंकार आला नाही .हरी भाऊंचे आणि माझे नाते कौटुंबिक स्वरूपाचे आहे .हरिभाऊनी आयुष्यात कधीच या कौटुंबिक प्रेमात दरी निर्माण होऊ दिली नाही. हरिभाऊंचे आणि माझे सातत्याने कोणत्या न कोणत्या विषयावर चर्चा होतच राहिली. त्यांनी आयोजित केलेल्या प्रत्येक कार्यक्रमाला मी आलोच पाहिजे अशी त्यांची आग्रही भूमिका राहायची. हरिभाऊंच्या जाण्याने आज पक्षाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. समाजाचे सुद्धा मोठे नुकसान झाले आहे, असे नेतृत्व घडायला खूप वर्ष लागतात. हरिभाऊंच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघण्यासाठी आहे .शैक्षणिक क्षेत्रामध्ये हरिभाऊंना विशेष रस होता. सन 1997 ला भालोद या एका छोट्या गावांमध्ये ग्रामीण भागातील मुलींना शिकता यावं याकरिता त्यांनी महाविद्यालयाची निर्मिती केली. महाविद्यालयाला शासनाची मान्यता मिळावी म्हणून मी उच्च शिक्षण मंत्री असताना माझ्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्या महाविद्यालयाला मी मंत्री असताना मान्यता दिली. त्याला येत्या दोन वर्षांनी पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत. पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आपल्याला रौप्य महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करायचा आहे, असं ते नेहमी मला म्हणायचे.

 

 

सहकार क्षेत्रामध्ये त्यानी विशेष अशा प्रकारचे काम केले विशेषता मधुकर सहकारी साखर कारखान्याचे ते चेअरमन राहिले. या काळामध्ये साखर कारखान्याला चांगले दिवस यावे म्हणून त्यांनी खूप खूप प्रयत्न केले. विशेष करून बनाना प्रकल्प जो त्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता त्याच्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली होती. मी मंत्री असताना या प्रकल्पासाठी साडेचार कोटी रुपये मंजूर केले. हा प्रकल्प त्यांनी चांगल्या प्रकारे चालविला. हरिभाऊ मुंबईला हॉस्पिटल मध्ये गेलेतेव्हा मी त्यांच्याशी फोनवर बोललो. काळजी करू नका भाऊ, असे म्हणताच त्यांना गहिवरून आले होते. हॉस्पिटलमध्ये असताना त्यांच्या मुलाशी म्हणजे अमोलशी संपर्कात होतो. तब्येतीची विचारपूस करत होतो. तीन दिवसांपूर्वी मुंबईला असताना त्यांच्या उपचारासाठी आवश्यक असलेली इंजेक्शन उपलब्ध होत नव्हती .त्यामुळे मी स्वतः आरोग्यमंत्री राजेश टोपे त्याचप्रमाणे वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉक्टर तात्याराव लहाने आणि अन्न व औषधी प्रशासन विभागाचे डॉक्टर संजय मुखर्जी यांच्याशी सातत्याने संपर्क केला.

 

तीन दिवसापूर्वी दोन इंजेक्शन उपलब्ध झाली. काल तीन इंजेक्शन उपलब्ध झाले आणि दुपारी साडेबारा वाजता दोन इंजेक्शन उपलब्ध झाले. परंतु तो पर्यंत खूप उशीर झाला होता, जर इंजेक्शन वेळेत उपलब्ध होऊ शकले असते तर कदाचित हरिभाऊ आज आमच्यात असते. परंतु नियतीला ते मान्य नव्हते आणि उपचार घेत असतानाच दुर्दैवाने हरिभाऊ यांचे निधन झाले. या काळात मी मुंबईला होतो. त्यांच्या मुलाशी म्हणजे अमोलशी सातत्याने संपर्कात होतो. सचोटीने व्यवहार करणारा ,प्रामाणिकपणाने काम करणारा ,कौटुंबिक नाते निर्माण करणारा ,एक सहकारी आम्ही गमावला आहे. त्यांच्या कुटुंबासोबत आम्ही आहोतच. हरीभाऊंचा अंत्यविधी हा मुंबई येथेच होणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी गर्दी करू नये व संयम ठेवावा असे आवाहन मी करीत आहे,असेही एकनाथराव खडसे यांनी सांगीतले आहे.

Protected Content