मिश्रांना बदला अन्यथा देशव्यापी रेल्वे रोको आंदोलन

नवी दिल्ली |  लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांना त्या पदावरून हटविण्यात न आल्यास येत्या सोमवारी, १८ ऑक्टोबर रोजी शेतकरी देशभरात रेल रोको आंदोलन करतील, असा इशारा संयुक्त किसान मोर्चाने दिला आहे.

 

लखीमपूर खेरी येथील हिंसाचारानंतर शेतकर्‍यांचे आंदोलन अजून तीव्र झाले आहे. या प्रकरणात एसआयटीने अजय मिश्रा यांचा पुत्र आशिष व आणखी काही जणांना अटक केली आहे. मात्र या कारवाईवर शेतकरी आंदोलक समाधानी नाहीत. लखीमपूर खेरी हिंसाचाराबाबत अजय मिश्रा यांनाही जबाबदार धरून त्यांना केंद्रीय गृहराज्यमंत्री या पदावरून हटवावे, अशी मागणी आंदोलकांनी लावून धरली आहे. मात्र तसा निर्णय केंद्र सरकारने न घेतल्यास शेतकरी १८ ऑक्टोबर रोजी देशव्यापी रेल रोको आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला आहे.

 

यासंदर्भात संयुक्त किसान मोर्चाने सांगितले की, येत्या सोमवारी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत रेल रोको आंदोलन प्रत्येक जिल्ह्यात करण्यात येईल. आंदोलनादरम्यान रेल्वेगाड्यांची वाहतूक रोखून धरण्यात येईल, असे भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते व शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी  सांगितले.

 

टिकैत म्हणाले,  हा हिंसाचार घडविण्यात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांनी कोणती भूमिका निभावली याची चौकशी झाली पाहिजे. त्याआधी त्यांना केंद्र सरकारने मंत्रीपदावरून हटवावे. मात्र त्यांना चौकशीसाठी पोलिसांनी बोलावलेले नाही किंवा अजय मिश्रांकडून मंत्रीपदाचा राजीनामाही केंद्राने घेतलेला नाही.

 

——————–

 

आता उद्धवजींमध्ये राहुलजी स्पष्टपणे दिसतात-नितेश राणे

 

मुंबई प्रतिनिधी | कालच्या दसरा मेळाव्यातील भाषणानंतर भाजप नेते नितीश राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करत त्यांच्यात राहूल गांधी स्पष्टपणे दिसत असल्याचा टोला लगावला आहे.

 

आमचा आवाज कोणी दाबू शकत नाही. आमचा आवाज दाबवणारा कधीच जन्माला येऊ शकत नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी  दसरा मेळाव्यातून विरोधकांवर टीका केली होती. काही जण केवळ माझं भाषण संपण्याची वाट पाहताहेत. भाषण कधी थांबतंय आणि कधी एकदा चिरकतोय, अशी काहींची अवस्था आहे. कारण शिवसेना आणि ठाकरे कुटुंबावर टीका करणं, चिरकणं यातूनच त्यांना रोजगार मिळतो, असा टोलाही त्यांनी लगावला होता. दरम्यान, दसरा मेळाव्यानंतर भाजपचे नेते नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

 

या संदर्भात नितेश राणे यांनी ट्विट केले आहे की, दसरा मेळाव्यानंतर आता पूर्ण आत्मविश्वासानं सांगू शकतो, आम्हाला उद्धवजींमध्ये राहुलजी एकदम स्पष्टपणे दिसतात. यात कोणतीही शंका नाही, असं म्हणत नितेश राणे यांनी टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

Protected Content