जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव ते शिरसोली रस्त्यावरील असलेल्या कृष्णा लॉनजवळ तरूणाच्या मित्रानेच इतर दोन साथीदारांच्या मदतीने रस्ता आडवून त्यांच्याजवळील मोबाईल आणि गळ्यातील चांदीची चैन असा एकुण १७ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी तरूणाच्या मित्रासह इतर दोन साथीदारांना एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, अभिषेक जगन्नाथ निंभोरे (वय-२४, रा. किसनराव नगर जळगाव) हा त्याचा मित्र साहिल कासार यांच्यासोबत मंगळवारी २८ मार्च रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास जळगाव- शिरसोली रस्त्यावरील कृष्णा लॉन्स जवळून दुचाकीने जात असतांना दोन जणांनी त्यांची दुचाकी आडविली व चाकूचा धाक दाखवून त्यांच्याजवळून मोबाईल आणि चांदीची गळ्यातील चैन असा एकुण १७ हजार रुपये किमतीचा ऐवज जबरी हिसकावून चोरून नेला होता. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने गोपनिय माहितीच्या अभिषेक निंभोरे यांचा मित्र साहिल विजय कासार (वय-२३, रा. सिंधी कॉलनी, जळगाव) यानेच त्याचे साथीदार भोला अजय सरपटे (वय-२२, रा. नवल कॉलनी) आणि आतिष नरेश भाट (वय-२३, रा. कंजरवाडा जळगाव) यांच्या मदतीने लुटमार केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार एमआयडीसी पोलीसांनी तिघांनी गुरूवारी ३० मार्च रोजी दुपारी २ वाजता अटक केली. तिघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे करीत आहे.