माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा द्या : महासंघाची मागणी

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | यवतमाळ जिल्ह्यातील माहिती अधिकार कार्यकर्ता अनिल देवराम ओचावार यांचे मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी तसेच स्व. ओचावार यांचे परिवारास शासनाकडू दहा लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणीचे निवेदन माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल अशोक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली अपर जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

 

निवेदनाचा आशय असा की, यवतमाळ जिल्हातील घाटंजी तालुक्यात पारवा या गावात माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल देवराम ओचावार यांची दि. १५ मे २०२२ रोजी मध्यरात्री अतिशय क्रूर पध्दतीने हत्या करण्यात आली.माहिती अधिकार अधिनियमानुसार माहिती मागितल्याने सूड भावनेतून सदर हत्या झाल्याचे पोलीसांच्या प्राथमिक तपासातून आणि प्रसार माध्यमातून मिळालेल्या माहितीतून समोर आलेले आहे. सदर घटना अत्यंत निंदनीय व धक्कादायक असून महाराष्ट्राच्या प्रागतीक परंपरेला काळीमा फासणारी आहे. तसेच शासन व प्रशासन भ्रष्टाचार मुक्त लोकाभिमुख व पारदर्शक चालावे म्हणून काम करणाऱ्या हजारो माहिती अधिकार कार्यकर्त्याचे तथा जागरुक व संवेदनशिल नागरिकांचे मनोधैर्य खच्चीकरण करणारी आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या मागण्य पुढीलप्रमाणे – स्व. अनिल देवराम ओचावार यांचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा व दोषी आरोपींना सहा महिन्याचे आत अत्यंत कठोर शिक्षा मिळावी. या प्रकरणात व कटात सामील असू शकणारे व अपराध्यांना चिथावणी देणारे सरकारी अधिकारी व सूत्रधार यांच्याही मुसक्या आवळाव्यात आणि त्यांची कसून चौकशी करुन ते यात दोषी आढळल्यास त्यांना ही सदर प्रकरणात सहआरोपी करण्यात यावे. माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून जीव धोक्यात घालत काम करुन प्रशासन व शासन पारदर्शक चालावे म्हणून आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्ता स्व. अनिल देवराम ओचावार यांचे कुटुंबीयांना दिलासा देण्यासाठी सरकारने तात्काळ दहा लाख रुपयांची आर्थिक मदत जाहिर करावी व द्यावी. माहिती अधिकार कार्यकर्त्यांना धमक्या देणे, त्यांना मारहाण करुन त्यांचेवर हल्ले करणे, त्यांच्या हत्या करणे अशा घटनांमध्ये दिवसेदिवस वाढ होत असून ही बाब अत्यंत गंभीर आहे, तरी माहिती अधिकार कायकर्त्यांची सुरक्षा व सरंक्षण यासंबंधी शासनाने धोरणात्मक उपाययोजना कराव्यात. माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी मागणी केली असल्यास त्यांना आवश्यक तेथे तातडीने पोलीसांनी संरक्षण उपलब्ध करुन द्यावे.
निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष अमोल अशोक कोल्हे, शैलेंद्र काशिनाथ सपकाळे, नरेंद्र भागवत सपकाळे, रोहित कैलास सोनवणे, गुणवंतराव जयवंतराव सोनवणे, विठ्ठल भालेराव, चंद्रकात प्रकाश श्रवणे आदींच्या सह्या आहेत.

Protected Content