जळगाव (प्रतिनिधी) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तासाठी मालेगावात हजर न होता, दांडी मारणार्या आणखी दोन पोलीस कर्मचार्यांना पोलीस अधीक्षकांनी निलंबित केले आहे. याआधी तीन पोलिसांना निलंबित करण्यात आले होते. सोनजी सुभाष कोळी व महेंद्र प्रकाश शिंपी असे निलंबित पोलीस कर्मचार्यांची नावं आहेत.
या संदर्भात अधिक असे की, जळगाव येथून मालेगावला 110 पोलीस कर्मचारी बंदोबस्ताकरीता पाठविण्यात आले हेाते. त्यापैकी जिल्हा मुख्यालयात नेमणुकीस असलेले सोनजी कोळी व महेंद्र शिंपी हे दोघं नेमुन दिलेल्या कर्तव्याचे ठिकाणी गैरहजर आढळून आले. त्यानुसार संबंधित कर्मचार्यांचा अहवाल पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्याकडे पाठविण्यात आला होता. पोलीस अधीक्षक श्री. उगले यांनी याबाबत अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांना चौकशीच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार त्यांनी सोनजी कोळी, व महेंद्र शिंपी या दोघांची चौकशी करुन त्यांचा अहवाल पोलीस अधीक्षकांकडे सादर केला होता. आज डॉ. पंजाबराव उगले यांनी दोघांना निलंबित करण्याचे आदेश काढले आहेत.