शेंदूर्णी, प्रतिनिधी | पावसाळ्यात विद्युत पोल व तारांवर लोंबकळत असणाऱ्या झाडाच्या फांद्या पडून दुर्घटना होण्याची शक्यता लक्षात घेता दरवर्षी विद्युत वितरण कंपनीकडून मे महिन्यात अशा झाडांच्या फांद्यांची छाटणी केली जाते. मात्र, यावर्षी ३१ मे उजेडला असला तरी अशी कोणतीच छाटणी करण्यात आली नसल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी मे महिन्यात रस्त्यावर असलेल्या झाडांच्या विद्युत पोल व विद्युत तारांवर लोंबणाऱ्या फांद्याची छाटणी केली जात जाते. त्यामुळे पावसाळ्यात वादळ वारा असतांनाही झाडांच्या फांद्या व झाडे तुटून विद्युत पोलवर व तारांवर न पडल्यामुळे अपघात होण्याची तसेच विद्युत पुरवठा खंडीत होण्याची शक्यता कमी होते. परंतु, यावर्षी मे महिन्याची शेवटची ३१ तारीख उजाडली तरी गावातील रस्त्यावर असलेल्या विद्युत तारेवर लोंबणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटणी करण्यासाठी संबंधित वायरमन व येथिल सहाय्यक मुख्यअभियंता यांना मुहूर्त गवसला नसल्याने नागरिकांना पावसाळ्यात वारा वादळ सोबतच खंडित विद्युत पुरवठ्याचा सामना करावा लागू शकतो. याची दखल शेंदूर्णी येथिल कनिष्ठ अभियंता यांनी घेउन त्वरित फांद्या छाटणीचे नियोजन करून लवकरच काम सुरु करावे अशी मागणी नागरिक करीत आहेत.