मातेने मुलाला सोडले…पोलिसांनी आजोबांच्या स्वाधीन केले !

भुसावळ संतोष शेलोडे । एका महिलेने पोटच्या गोळ्याला भुसावळ रेल्वे परिसरात सोडले, मात्र पोलिसांनी या चिमुकल्याला त्याच्या आजोबांपर्यंत पोहचवल्याची घटना येथे घडली.

याबाबत माहिती अशी की, नागपूर जिल्ह्यातील ढोरमाळा गावातील शुभांगी पप्पूजी शिवणकर ही महिला २३ जानेवारी रोजी ५०० रुपये न दिल्यामुळे सासू- सासर्‍याशी भांडण करून मुलाला सोबत घेऊन भुसावळ मध्ये रेल्वेने आली होती. येथील रेल्वे स्थानकावर मुलास द्राक्षे घेण्यासाठी पाठवून ती दोन अनोळखी दोन इसमांसोबत कोणालाही न सांगता निघून गेली. आईला शोधूनदेखील मिळत नसल्यामुळे तो मुलगा रडू लागला. यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळील रिक्षा स्टॉप वरील काही चालकांनी त्या मुलाची विचारणा केली. मात्र त्याला व्यवस्थिती माहिती देता न आल्यामुळे रिक्षा चालकांनी बाजारपेठ पोलीस स्टेशनला फोन लावून निरीक्षक पवार यांना कळविले.

पो.कॉ.सचिन चौधरी,पो.कॉ. बापूराव बजगुजर,पो.कॉ.सैय्यद आयज,गजानन वाघ,सुभाष साळवे यांनी घटनास्थळी जाऊन आजूबाजूला विचारपूस केली. मुलाला ही विचारपूस केली.पण त्या मुलाची भाषा कुणालाही समजत नसल्यामुळे शोध घेण्यासाठी अडचणी आल्या. तथापि, पोलीस कर्मचार्‍यांनी त्या मुलाचे फोटो पोलीसांच्या व्हाट्सअप ग्रुपवर टाकले. यावरून त्यांना हा मुलगा नागपूर कडील असावा अशी माहिती मिळाली. त्या परिसरातील काही पोलीस कर्मचार्‍यांशी संपर्क साधला असता त्यांना त्या मुलाची भाषा समजली. त्याचे नाव नैतिक शिवणकर असल्याचे समजले. त्या मुलाकडून गावचे नाव विचारले.त्या आधारे तपास केला असता त्या मुलाच्या आजोबांचा शोध लावण्यास पोलिसांना यश आले.

पोलीसांनी आजोबा हनुमंत रामरावजी वैद्य यांच्याशी संपर्क केला. यानंतर नैतिक शिवणकर याचे आजोबा हनुमंत रामरावजी वैद्य,मामा मंगेश वैद्य, संदीप वैद्य सकाळी बाजारपेठ पोलीस स्टेशनला आले निरीक्षक देविदास पवार यांची भेट घेतली. दरम्यान, या चिमुकल्याला तीन दिवस आपली नोकरी संभाळून पो.कॉ.अश्‍विनी जोगी यांनी आपल्या घरी नेऊन संभाळ केला. अशा प्रकारे मातेने मुलाचा त्याग केला तरी पोलिसांनी त्याला त्याचे आजोबा मिळवून दिले.

Add Comment

Protected Content