जळगाव, प्रतिनिधी । बांधकाम व्यावसायिक खुबचंद साहित्या यांच्यावर प्राणघातक हल्ला प्रकरणातील मुख्य संशयित माजी महापौर ललित कोल्हे याच्या चार दिवसांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने आज पुन्हा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने संशयिताची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. चार दिवसांच्या कोठडीत संशयिताकडून पोलिसांनी महागडी जीपकार जप्त केली असून तपासा बाबत फारसे सहकार्य करीत नसल्याचे तपासाधिकाऱ्यांनी सांगितले.
शहरातील व. वा. वाचनालया मागील गोरजाबाई जिमखान्यात १६ जानेवारी २०२० ला रात्री साडेआठच्या सुमारास बांधकाम व्यावसायिक खुबचंद साहित्या यांच्यावर माजी महापौर ललित कोल्हे यांच्यासह पाच ते सात जणांनी हल्ला केला होता. या घटनेत साहित्या हे गंभीर जखमी झाले होते. शहर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात यापूर्वीच पाच जणांना अटक करण्यात आली होती. गुन्हा घडल्या पासून फरार असलेल्या ललित कोल्हे यास २७ मे रोजी अटक करण्यात आली होती. अटकेनंतर शहर पोलिसांनी त्याच्या ताब्यातील महागडी कार गुन्ह्यात जप्त केली असून गुन्ह्यात वापरलेल्या हत्यारा संबधी आणि खंडणीच्या रकमे बाबत संशयित उडवा उडवीची उत्तरे देत असल्याचे तपासाधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिस कोठडीची मुदत पूर्ण झाल्यावर आज पुन्हा न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने संशयितास न्यायालयीन कोठडीत अर्थात जिल्हा कारागृहात रवाना करण्याचे आदेश दिले.