


नागपूर : वृत्तसंस्था । प्रेमीयुगुलात टोकाचा वाद होऊन प्रियकराने विवाहित प्रेयसीला जिवंत जाळल्याच्या घटनेनं नागपूर हादरलं आहे. ही भयंकर घटना अंजुमन अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर शुक्रवारी सायंकाळी घडली. प्रेयसीनं उपचारादरम्यान प्राण सोडले.
शबाना अब्दुल जावेद (वय ४०, रा. महेद्रनगर) असं मृत महिलेचं नाव आहे. शबाना धंतोली आदित्य मोटर्स येथे कार्यरत होत्या. शुक्रवारी त्यांचा प्रियकरासोबत वाद झाला. वाद टोकाला गेला. संतापलेल्या प्रियकराने बाटलीतील पेट्रोल शबाना यांच्या अंगावर टाकले. त्यानंतर शबाना यांना पेटवून देत प्रियकर घटनास्थळावरून पसार झाला.
प्रियकर दुचाकीवर निघून गेल्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी हे दृश्य बघून घटनास्थळी धाव घेतली. आग विझवून शबाना यांना खासगी रुग्णालयात दाखल केलं. उपचारादरम्यान शनिवारी त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला बेड्या ठोकल्या.
प्रियकराने प्रेयसीला जाळल्याच्या घटनेबरोबरच शहरात विवाहितेच्या खुनाचा प्रयत्न झाल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. लग्नात महागड्या वस्तू न मिळाल्याने सासऱ्याने नातेवाईकांच्या मदतीने विवाहितेला चौथ्या मजल्यावरून ढकलून ठार मारण्याचा प्रयत्न केला. न्यू नरसाळा मार्गावरील शारदा कॉम्प्लेक्स येथे ही घटना २३ डिसेंबरला घडली. करिश्मा साकेत तामगाडगे असं जखमी विवाहितेचं नाव आहे. पोलिसांनी पती साकेत तामगाडगे, सासरे भीमराव तामगाडगे, सासू ललिता, नणंद प्राची वासनिक व प्राची यांचे पती राहुल या पाच जणाविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा व हुंडा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.



