मुंबई : वृत्तसंस्था । “मंदिरं सुरू करायची असतील तर कशाप्रकारची रचना पाहिजे, त्याच्यावर चर्चा करता येईल. तुम्ही पुढे या आम्ही शासनाला सांगू… एकत्र बसून ठरवू, परंतु मंदिरं उघडलीच पाहिजे अशाप्रकारचा हट्ट का? इतर लोक सरकारशी चर्चा करतात तर तुम्हाला चर्चा करायला अडचण का वाटते,” असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हेमंत टकले यांनी भाजपाला टोला लगावला आहे.
भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीनं तुळजापूर आणि पंढरपूर येथे मंदिरं उघडण्यासाठीच्या मागणीवरून आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यावर राष्ट्रवादीचे सचिव व माजी आमदार हेमंत टकले यांनी टीका केली. “मंदिरं, धार्मिक स्थळं उघडली पाहिजेत. मशीद, चर्च, गुरुद्वारा हे धार्मिक अधिष्ठान असलेले वेगवेगळे समुह आहेत. परंतु याचा राजकारणाशी जोडण्याचा काय संबंध? जेव्हा एखाद्या राज्यातील प्रशासन संभाव्य परिणामांचा अभ्यास करून काही गोष्टींबद्दल टप्प्याटप्प्यानं निर्णय घेत असते. त्यामुळे उगाचच आगावूपणे अशाप्रकारची आंदोलने करून काय मिळते,” अशी टीका हेमंत टकले यांनी भाजपावर केली आहे.
“थिएटर, मॉल सुरू केले आणि बाजारातही गर्दी दिसते आहे, मग मंदिरांनीच काय केले असा सवालही करत आहेत. परंतु मंदिरात येणारा भाविक असतो, त्याची अडवणूक करणं कुणालाही जमणार नाही. वास्तविक कुठल्याही मंदिराच्या वास्तू रचनेतून पाहिले तर आतला गाभारा हा लहान असतो. तिरुपती देवस्थानासारखं रांगेत या लांबून दर्शन घ्या ही पद्धत आपल्याकडे नाही. आपल्या धार्मिक स्थळावर त्याला एसओपी म्हणतात तसं तयार केलेले नाही,” असंही हेमंत टकले यांनी स्पष्ट केलं.
“शासनाच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी, मास्क नाही तर प्रवेश नाही या सगळ्या एक जनजागरणाच्या मोहिमा आहेत. या मोहिमामध्ये अशा मंदिरे उघडा आंदोलनाने खोडा घालण्याचे काम कशासाठी करताय?,” असा प्रश्न टकले यांनी उपस्थित केला आहे.