मुंबई वृत्तसंस्था । विधानसभा निवडणुकीच्या काळात अनेक नेते, आमदार व खासदार पक्ष सोडून गेल्यामुळं धक्का बसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनं पुन्हा एकदा बेरीज सुरू केली आहे. परभणी जिल्ह्यातील गंगाखेडचे माजी आमदार सीताराम घनदाट यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. अभ्युदय बँकेचे संचालक व सहकार क्षेत्रातील एक मोठं नाव असलेल्या ‘घनदाट मामा’च्या प्रवेशामुळं राष्ट्रवादीला बळ मिळाल्याचं मानलं जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईतील कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडला. सीताराम घनदाट यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. ‘पक्षाची ध्येयधोरणे लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी सीताराम घनदाट व त्यांचे कार्यकर्ते प्रयत्न करतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.
सीताराम घनदाट हे २००९ साली परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आले होते. मागील निवडणुकीतही ते अपक्ष रिंगणात होते. मात्र, त्यांचा पराभव झाला होता. मागील निवडणुकीच्या वेळीच ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार होते. मात्र, तिकीट मिळण्याची शक्यता नसल्यानं त्यांचा प्रवेश रखडला होता.