महिलेवर अत्याचार करणाऱ्याला ७ वर्ष सश्रम कारावास

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यातील एका गावात घरात महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात जिल्हा न्यायालयाने आरोपीस ७ वर्ष सश्रम कारावास व ३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सोमवार, १३ फेब्रुवारी रोजी जळगाव जिल्हा न्यायालयातील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.आर.पवार यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला. किशोर कडू ढगे असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

एरंडोल तालुक्यातील एका गावात २ मार्च २०१८ दुपारी अडीच वाजेच्या सुमारास महिला घरात झोपलेले असतांना किशोर ढगे हा घरात घुसला व त्याने जबरदस्तीने महिलेवर अत्याचार केले तसेच घटना कोणाला सांगितल्यास पुन्हा तिच्यावर शारिरीक अत्याचार करण्याची धमकी दिली होती, याप्रकरणी पिडीत महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन किशोर ढगे याच्याविरुध्द एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा खटला जळगाव जिल्हा न्यायालयातील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.आर.पवार यांच्या न्यायालयासमोर चालला. यात सरकारपक्षातर्फे एकूण ६ साक्षीदार तपासण्यात आले. पिडीत महिलेची साक्ष खटल्यात महत्वपूर्ण ठरली. साक्षी पुराव्याअंती न्यायालयाने आरोपी किशोर ढगे यास दोषी धरले, तसेच ७ वर्ष सश्रम कारावास व ३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारपक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता रमाकांत सोनवणे यांनी काम पाहिले. ॲड सोनवणे यांनी सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाचे निवाडे सादर करुन प्रभावी युक्तीवाद केला. पैरवी अधिकारी हर्षवर्धन सपकाळे यांनी काम पाहिले.

Protected Content