महिला काँग्रेसच्या अध्यक्षांचा राजीनामा

 

नवी  दिल्ली : वृत्तसंस्था ।  ​काँग्रेसच्या खासदार आणि अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुष्मिता देव यांनी आपल्या पदाचा आणि काँग्रेस पक्षाचा देखील राजीनामा दिला आहे.

 

​ट्विटर हँडलवर देखील काँग्रेसच्या माजी नेत्या असा उल्लेख करण्यात आला आहे. पक्षाच्या एका विंगच्या राष्ट्रीय अध्यक्षांनीच राजीनामा दिल्यामुळे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, आयुष्याची दुसरी इनिंग सुरू करत असल्याचं सुष्मिता देव यांनी म्हटलं आहे.

 

सुष्मिता देव यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना सोत्र पाठवलं आहे. आपल्या पत्रालाच राजीनामा समजण्यात यावं, अशी विनंती देखील सुष्मिता देव यांनी केली आहे. आपण काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचं त्यांनी यात नमूद केलं आहे. तक्षातील इतर सदस्यांचे, नेत्यांचे त्यांनी आभार मानले आहे.

 

“भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षासोबत गेल्या तीन दशकांचा माझा प्रवास मला कायम लक्षात राहील. या निमित्ताने मी पक्षाचे, पक्षाच्या सर्व नेत्यांचे, सदस्यांचे आणि पक्ष कार्यकर्त्यांचे आभार मानते. माझ्या या प्रवासात तुम्ही सर्वजण माझ्यासोबत होतात”, असं आपल्या पत्रात सुष्मिता देव यांनी नमूद केलं आहे.

 

​त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे वैयक्तिकरीत्या आभार मानले आहेत. “मॅडम, तुम्ही मला दिलेल्या संधीसाठी आणि तुमच्या मार्गदर्शनासाठी मी तुमचे वैयक्तिकरीत्या आभार मानते. हा अनुभव माझ्यासाठी फार महत्त्वाचा होता”, असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे. सुष्मिता देव या सात वेळा खासदार राहिलेले संतोश मोहन देव यांच्या कन्या आहेत. आसाममधल्या बंगाली भाषिकांचं प्राबल्य असलेल्या भागात सुषिमिता देव यांचा प्रभाव होता. गेल्या आठवड्यातच सुष्मिता देव यांनी राहुल गांधींचं ट्विटर अकाऊंट बंद केल्यानंतर आपल्या ट्विटरवर प्रोफाईलला त्यांचा फोटो देखील लावला होता. शनिवारी त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज सोमवारी त्यांनी राजीनामा दिल्याचं पत्र पाठवलं.

 

Protected Content