चाळीसगाव, प्रतिनिधी । विविध क्षेत्रातील महिलांनी स्वतःमधील कौशल्य ओळखून पुढे येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मेकअप आर्टिस्ट अलका गोविंद यांनी चाळीसगाव येथे आयोजित वर्कशॉपमध्ये केले.
आजच्या आधुनिक महिलांना मेकअप व हेअरस्टाईल विषयी अधिक माहिती मिळावी या पार्श्वभूमीवर शहरातील अन्नपूर्णा रेसीडेन्सी येथे शनिवार व रविवार अशा दोन दिवसांसाठी वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले. विजय वाघ व रश्मी लोडाया यांच्या संयुक्त विद्यमाने या वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले होते. या वर्कशॉपमध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुंबई येथील प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट अलका गोविंद ह्या उपस्थित होत्या. या वर्कशॉपमध्ये एकूण वीस महिलांनी समभाग नोंदविला. यावेळी मेकअप आर्टिस्ट अलका गोविंद यांनी थ्रीडी मेकअप, हेअरस्टाईल कशाप्रकारे केले जाते हे प्रात्यक्षिक करून दाखविले. त्याचबरोबर विविध क्षेत्रातील महिलांनी खास करून ग्रामीण भागातील महिलांनी स्वतःतील गुण ओळखून पुढे यायला हवे आणि त्याच क्षेत्रात यश मिळवून स्वतःच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावावा असे आवाहन अलका गोविंद यांनी यावेळी केले. सहभागी झालेल्या मुली वा महिलांनी अतिशय साध्या व सोप्या पद्धतीने मेकअप व हेअरस्टाईल शिकविल्या बद्दल आनंद व्यक्त केला. याप्रसंगी अलका गोविंद, विजय वाघ, रश्मी लोडाया व मोठ्या संख्येने कलाप्रेमी उपस्थित होते.