महावितरण जळगाव परिमंडलाच्या मुख्य अभियंतापदी कैलास हुमणे रुजू

जळगाव प्रतिनिधी – महावितरण जळगाव परिमंडलाच्या मुख्य अभियंतापदी  कैलास दयाराम हुमणे हे आज रुजू झाले आहेत.

मूळचे बोरगाव बु. (ता.जि.भंडारा) येथील रहिवासी असलेले श्री.हुमणे यांनी कराडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून  विद्युत अभियांत्रिकीतील पदवी संपादन केलेली आहे. श्री.हुमणे हे तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात 1991 मध्ये पालघर विभाग येथे कनिष्ठ अभियंता म्हणून रुजू झाले. त्यानंतर याच पदावर त्यांनी बल्लारपूर (जि.चंद्रपूर) येथे काम केले. त्यानंतर 1994 मध्ये पदोन्नतीवर सहायक अभियंता म्हणून त्यांनी समुद्रपूर व हिंगणघाट (जि.वर्धा) येथे 9 वर्षे काम केले. 2005 मध्ये उपकार्यकारी अभियंतापदी पदोन्नती झाल्यावर त्यांनी कळवा व ऐरोली (जि.ठाणे) येथे काम केले. 2010 मध्ये सरळ सेवा भरतीद्वारे त्यांची अधीक्षक अभियंतापदी  निवड झाली.             या पदावर त्यांनी बारामती, ठाणे नागरी मंडल, हिंगोली व जालना मंडल येथे काम केले. ऑगस्ट 2021 मध्ये त्यांची मुख्य अभियंतापदी पदोन्नती झाली.

बारामती येथे पायाभूत आराखडा विभागाचे अधीक्षक अभियंता असताना त्यांनी 100 विद्युत उपकेंद्रे व 10 हजार वितरण रोहित्रांचे काम विक्रमी  वेळेत पूर्ण केले. ठाणे नागरी मंडलात स्काडा प्रणाली प्रभावीपणे राबविण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. राज्य शासनाची अत्यंत महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना  जालना मंडलात त्यांनी अत्यंत यशस्वीपणे राबवून महाराष्ट्रातील सर्वाधिक 16 हजारांहून सौर कृषिपंप बसवले. त्याचा शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळवण्यास लाभ होत आहे. तसेच गावोगावी एरियल बंच केबल टाकून वीजचोरीला आळा घालून वीज हानी कमी करण्यात यश मिळवले. तसेच उच्चदाब वितरण प्रणाली योजनेत हजारो शेतकऱ्यांना वीजजोडणी दिल्याने त्यांना सुरळीत वीजपुरवठा होण्यास मदत होत आहे.

जळगाव परिमंडलात वीजग्राहक हा केंद्रबिंदू मानून काम करणार आहे. परिमंडलातील ग्राहकांना अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच ग्राहकसेवा उंचावण्यावर भर देणार आहे, असे मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी सांगितले.

Protected Content