जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरातील रजा नगरात घराची व इतर परिसरातील वीज बंद झाल्याच्या रागातून एकाने महावितरण कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत वाद घातल्याची घटना गुरुवार, १६ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जळगाव शहरातील हरिविठ्ठल नगर परिसरातील अर्जून नगरात महावितरण कंपनीचे वरिष्ठ तंत्रज्ञ इतबार साहेबु तडवी वय ३३ हे वास्तव्यास आहे. गुरुवारी दुपारी पिंप्राळा हुडको परिसरातील रजा नगरात वीज बंद असल्याने वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी इतबार तडवी हे गेले होते, यादरम्यान वीज बंद असल्याचा राग आल्याने रजा नगरातील सलमान शेख साजीद याने महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ इतबार तडवी यांना शिवीगाळ करत वाद घातला, तसेच शासकीय कामात अटकाव केला. याप्रकरणी महावितरणचे इतबार तडवी यांच्या तक्रारीवरुन सलमान शेख साजीद याच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय सपकाळे हे करीत आहेत.