जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील नंदगाव शिवारातील सोपान मुरलीधर पाटील यांच्या शेतात असलेले महावितरण कंपनीच्या मालकीचे ३० हजार रुपये किमतीचे ३५ एमएम ॲल्युमिनियमच्या तार अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, महावितरण कंपनीने नंदगाव शिवारातील सोपान मुरलीधर पाटील यांच्या शेत वस्तू ठेवण्यासाठी भाड्याने घेतले होते. हे शेत गट १९/१ मध्ये ट्रांसफार्मरसाठी लागणारे ३० हजार रुपये किमतीचे २७०० मीटर लांबीचा ३५ स्क्वेअर मीटर अल्यूमिनीअम तार ठेवले होते. २५ जुलै सायंकाळी ६ वाजता आणि २६ जुलै सकाळी ९ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ३० हजार रूपये किंमतीच्या अल्यूमिनीअमच्या तारांची चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी महावितरण कंपनीचे महावितरण कंपनीचे वरिष्ठ तंत्रज्ञ योगेश सपकाळे (वय-३०) रा.मोहाडी ता.जि.जळगाव यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक मनोज पाटील करीत आहे.