महावितरणचा सावधानतेचा इशारा : वैयक्तिक मोबाईल क्रमांकाच्या मेसेजला प्रतिसाद न देण्याचे आवाहन

बुलढाणा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | मागील काही दिवसांपासून विविध ग्राहकांना बनावट एसएमएस पाठवून लुबाडण्याचे प्रकार घडत आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून प्राप्त झालेल्या बनावट ‘एसएमएस’ना कोणताही प्रतिसाद देऊ नये असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

 

वीजग्राहकांना वैयक्तिक क्रमांकावरून बनावट ‘एसएमएस’ पाठवून वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधायला सांगणे. त्यानंतर एखादी लिंक पाठवून किंवा सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यास सांगणे व याप्रकारे वीजग्राहकाने प्रतिसाद दिल्यास आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार होत आहे. मागील काही दिवसांपासून विविध ग्राहकांना बनावट एसएमएस पाठवून लुबाडण्याचे प्रकार घडत आहे. ‘मागील महिन्याचे वीजबिल अपडेट नसल्याच्या कारणावरून आज रात्री ९.३० वाजता वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. करिता ताबडतोब सोबत दिलेल्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा’, असे बनावट ‘एसएमएस’ नागरिकांना पाठविण्यात येत आहेत. मात्र कोणत्याही वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून अशा प्रकारचे ‘एसएमएस’ व व्हॉट्स अॅप मेसेज पाठविण्यात येत नाही, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

महावितरणकडून केवळ मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या वीजग्राहकांनाच सिस्टीमद्वारे ‘एसएमएस’ पाठविण्यात येतात आणि त्याचा सेंडर आयडी (Sender ID) हा ‘एमएसईडीसीएल’ (MSEDCL) (उदा. VM-MSEDCL, VK-MSEDCL) असा आहे. तसेच या अधिकृत मेसेजमधून वीजग्राहकांना किंवा नागरिकांना महावितरणच्या कोणत्याही अधिकाऱ्याच्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क करण्याबाबत कळविले जात नाही.  ‘वीजबिलाची रक्कम भरलेली नसल्याने वीजपुरवठा आज रात्री खंडित करण्यात येत आहे’ असा संदेश वेगवेगळ्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून पाठविण्यात येत असल्याचे पुन्हा प्रकार घडत आहेत. या मेसेजनंतर वीजबिल भरण्यासाठी वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून ऑनलाईन पेमेंटसाठी बनावट लिंक पाठविण्यात येत आहे. तसेच ग्राहकांना वीजबिल भरण्यासाठी सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यास सांगितले जात आहे. ग्राहकांनी त्यास प्रतिसाद दिल्यास मोबाईल किंवा संगणक हॅक करून बॅक खात्यातील शिल्लक रक्कम लंपास करण्याची मोठी शक्यता आहे. त्यामुळे वीजग्राहकांनी या बनावट मेसेज व लिंककडे संपूर्णपणे दुर्लक्ष करावे.
महावितरणकडून मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या वीजग्राहकांनाच ‘एसएमएस’द्वारे पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्ती, तांत्रिक किंवा अन्य कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास तो पूर्ववत होण्यास लागणारा संभाव्य कालावधी तसेच दरमहा वीजबिलांची रक्कम, स्वत:हून मीटर रिडींग पाठविण्याचे ग्राहकांना आवाहन, मीटर रिडींग घेतल्याची तारीख व वापर केलेली एकूण युनिट संख्या, वीजबिलाची रक्कम, देय दिनांक, वीजपुरवठा खंडित करण्याची रीतसर नोटीस आदींची माहिती पाठविण्यात येते.
परंतु, सध्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून नागरिकांना पाठविण्यात येणारे मेसेज हे बनावट आहे. त्यास प्रतिसाद देऊ नये. बिलाच्या पेमेंटसाठी लिंक किंवा कोणतेही सॉफ्टवेअर डाऊनलोड करून नये. तसेच मेसेजमध्ये नमूद केलेल्या कोणत्याही वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू नये. काही शंका व तक्रारी असल्यास वीजग्राहकांनी चोवीस तास सुरु असलेल्या १९१२, १८००१०२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांक किंवा नजीकच्या कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Protected Content