महाराष्ट्रासह देशात कोरोनाची तिसरी लाट?

 

मुंबई : वृत्तसंस्था ।  आठवड्याभरापासून देशातला कोरोना रुग्णांचा आकडा पुन्हा झपाट्यानं वाढतोय. महाराष्ट्रातही कोरोना केसेसमध्ये अचानक वाढ होताना दिसतेय. 

 राज्यात गेल्या चोवीस तासात  6 हजार  600 नव्या रुग्णांची भर पडलीय तर देशात हा आकडा 41 हजार पेक्षा जास्त  आहे. त्यातही 41 हजार रुग्णांपैकी एकट्या  केरळच्या रुग्णांची संख्या  निम्म्यावर आहे.

बारामती, लातूर, बीड अशा ठिकाणी कोरोनाचा प्रार्दुर्भाव वाढतानाच दिसतोय. महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासात साडे सहा हजारापेक्षा जास्त नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. हा आकडा येत्या एक दोन दिवसात 10 हजाराच्या घरात पोहोचण्याची भीती व्यक्त केली जातेय. काल  7  हजार 431 रुग्ण बरे होऊन घरी परतलेत. तर 231 जणांना मात्र जीव गमवावा लागलाय. सध्यस्थितीत महाराष्ट्रात सक्रिय रुग्णांचा आकडा  77 हजार 494 एवढा आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोनामुळे 1 लाख 32 हजार 566 रुग्णांचा  बळी गेलाय.

केरळ सरकारच्या माहितीनुसार गेल्या चोवीस तासात तिथं कोरोनाचे  20 हजार 772 नवे रुग्ण आढळून आलेत. तर 116 रुग्णांचा मृत्यू झालाय. देशात ज्या नव्या केसेस सापडतायत त्यात एकट्या केरळचा वाटा हा पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

केरळमध्ये 13.61 एवढा संक्रमनाचा दर आहे. बकरी ईदला केरळ सरकारनं मोठी सुट दिली आणि त्याचाच परिणाम म्हणून कोरोनाचा स्फोट झाल्याचा आरोपही केला जातोय. पण कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पहाता, तिथल्या सरकारनं शनिवार, रविवार असे दोन दिवस संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केलीय.

गेल्या चार दिवसांपासून देशात रोज कोरोनाचे 40 हजारापेक्षा जास्त रुग्ण सापडतायत. गेल्या चोवीस तासात 41 हजार 649 एवढे नवे रुग्ण सापडलेत. शुक्रवारी हाच आकडा 44 हजार 230 एवढा होता. अजूनही रिकव्हरी रेट 97 टक्क्यापेक्षा जास्त आहे. गेल्या चोवीस तासात 37 हजार 291 रुग्ण कोरोनावर मात करण्यात यशस्वी झालेत

 

Protected Content