महाराष्ट्राला मागणीप्रमाणे खते द्या — दादा भुसे

 

मुंबई : वृत्तसंस्था । महाराष्ट्राला या वर्षी खरीप हंगामासाठी आवश्यक खत पुरवठा वेळेवर आणि मागणीप्रमाणे करावा, अशी मागणी राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केंद्रीय खते व रसायन मंत्री सदानंद गौडा यांच्याकडे केली आहे.(

अवकाळीचा तडाखा आणि रोगराईमुळं राज्यातील शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे. कोकण किनारपट्टीवरील निसर्ग चक्रीवादळ आणि त्यानंतर मराठवाडा, विदर्भात झालेला अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला. अशास्थितीत बळीराजा आता खरीपाच्या तयारीला लागला आहे. त्या पार्श्वभूमी कृषीमंत्री दादा भुसे यांनी केंद्र सरकारकडे महत्वाची मागणी केली आहे.

दादा भुसे हे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी केंद्रीय खते व रसायन मंत्री यांची भेट घेतली. यावेळी राज्यातील शेती आणि शेतकऱ्यांशी संबंधित प्रश्नांबाबत त्यांनी चर्चा केली. राज्याचे कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यावेळी उपस्थित होते. राज्याला खरीप हंगामासाठी सुमारे ४४ . ५० लाख मेट्रीक टन खताची आवश्यकता आहे. त्याचा पुरवठा केंद्राकडून केला जातो. खरीप हंगामासाठी जून आणि जुलै महिन्यात खताला मोठ्या प्रमाणावर मागणी असते. गेल्या वर्षी खरीप हंगामामध्ये जून ते ऑगस्ट या कालावधीत खत पुरवठा विस्कळीत झाला होता.

 

यंदाच्या खरीप हंगामासाठी राज्य शासन २ लाख मेट्रीक टन युरियाचा अतिरिक्त साठा करणार आहे. ज्या महिन्यामध्ये पिकाच्या गरजेप्रमाणे खताची मागणी आहे, त्याप्रमाणे वेळेवर आणि पुरेसा खत पुरवठा व्हावा, असंही भुसे यांनी यावेळी सांगितलं

Protected Content