बीड (वृत्तसंस्था) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे हे सध्याची परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळत आहेत. चांगले काम करताहेत, अशा शब्दात भाजप नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांचे कौतुक केले आहे.
एका न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत मुंडे म्हणाल्या की, महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख म्हणून मी त्यांना शुभेच्छा देते. उद्धव ठाकरे व्यवस्थितपणे परिस्थिती हाताळत असल्याचे मला दिसतंय. टीका करणार नाही. तसं वाटले तर सूचना करेल. तितका अधिकार मला त्यांच्याविषयी वाटतो. कोरोनाचे संकट फक्त महाराष्ट्रात आहे, असे नाही. ते जगात आहे. सगळेच त्याच्याशी लढताहेत. आजच्या परिस्थितीत आपण सगळेच खूप छोटे दिसतोय. त्यामुळे आपली भूमिका सहकार्याचीच असायला हवी. जे चाललेय ते ठीक आहे. सरकार परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करतंय. चुकीचे काही घडत असेल तर बोट दाखवूच.परंतू उद्धव ठाकरे नवीन असा पायंडा ते पाडू शकतात असं मला वाटतंय. आजच्या परिस्थिती माझ्या त्यांना पूर्ण शुभेच्छा आहेत, असेही पंकजा मुंडे यांनी सांगितले.