महापौरांच्या पाठपुराव्यानंतर नगरोत्थान योजनेंतर्गत कामांना मंजुरी

जळगाव, प्रतिनिधी  ।  शहरातील विविध विकासकामांसाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत २२ कोटी ८६ लाख ९८ हजारांचा निधी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी मंजूर केला होता. महापौर जयश्री महाजन यांनी केलेल्या पाठपुराव्याने २१ कोटी ९८ लाख ९४ हजार २७९ रकमेच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचे आदेश गुरुवारी काढले आहेत.

 

जळगाव शहरातील विविध विकासकामांसाठी पालकमंत्री ना.गुलाबराब पाटील यांच्या माध्यमातून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत २२ कोटी ८६ लाख ९८ हजारांचा निधी प्राप्त झाला होता. नगरोत्थान योजनेंतर्गत प्राप्त कामांच्या प्रस्तावाला मंजुरीचे अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले आहे. जळगाव मनपाकडून रस्ते, गटारी, उद्यान, जीम अशा विविध कामांचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. शहरातील परिस्थिती लक्षात घेता प्रस्तावाला लवकरात लवकर मंजुरी मिळावी यासाठी महापौर जयश्री महाजन यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता. महापौरांच्या पाठपुराव्याने प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे.

याबाबत अधिक माहिती देतांना महापौर जयश्री महाजन यांनी सांगितले की, जळगाव शहराच्या विकासात्मक दृष्टीने नगरोत्थान योजना महत्वाची आहे. आज मंजूर झालेल्या कामांची पुढील प्रक्रिया लागलीच सुरू करण्यात येणार असून मार्च अखेरपर्यंत काम पूर्ण करण्यात येतील. पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील व इतर पदाधिकाऱ्यांनी शहराच्या विकासाकडे लक्ष घातले असून रस्ते, गटारीची कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात येतील.

 

Protected Content