महापालिका निवडणूक स्वबळावर की आघाडी ? ; निर्णयासाठी काँग्रेसच्या बैठकीचे आयोजन

 

मुंबई:  वृत्तसंस्था । येत्या २४  ते २६ फेब्रुवारीपर्यंत काँग्रेसची मुंबईत मॅरेथॉन बैठक होणार असून त्यात महापालिका निवडणुकांबाबतच्या आघाडीवर चर्चा करण्यात येणार आहे. त्यामुळे या तीन दिवसाच्या बैठकीत काँग्रेस काय निर्णय घेणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे

 

राज्यात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत काँग्रेस आघाडी करणार का? असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. या प्रश्नाचं लवकरच उत्तर मिळण्याची शक्यता आहे.

 

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली २३ फेब्रुवारी रोजी प्रदेश काँग्रेसच्या निवड मंडळाची बैठक महिला विकास महामंडळ, नरिमन पाईंट येथे होणार आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून पटोले यांच्या अध्यक्षतेखाली होणारी ही पहिलीच बैठक आहे. या बैठकीला महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांच्यासह निवड मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत.

 

या बैठकीत पक्ष संघटना मजबूत करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. शेतकरी विरोधी काळे कृषी कायदे व इंधन दरवाढीविरोधात आंदोलन व जनजागृती मोहिम राबविण्याबाबतही या बैठकीत रणनिती ठरवली जाणार आहे.

 

राज्यातील आगामी ५ महानगरपालिका तसेच ९८ नगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना बांधणीसंदर्भातनाना पटोलेंच्या अध्यक्षतेखाली  या ३ दिवसात  जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीबरोबर बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई काँग्रेसचे कार्यालय राजीव गांधी भवन येथे २४ फेब्रुवारी रोजी सकाळी नवी मुंबई शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, दुपारी  कल्याण शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, वसई विरार जिल्हा काँग्रेस कमिटी व कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक घेतली जाणार आहे. गुरुवारी  औरंगाबाद ग्रामीण व शहर, भंडारा, गोंदिया व ठाणे ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक होत आहे. शुक्रवारी यवतमाळ, चंद्रपूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक घेऊन संघटनात्मक कार्याचा आढावा घेतला जाणार आहे  संध्याकाळी भिवंडी येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

Protected Content