महसूल कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन

अमळनेर प्रतिनिधी | येथील तहसील कार्यालयातील महिला कर्मचार्‍यांना शिविगाळ झाल्याने कर्मचारी संघटनेने काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

येथे तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेच्या सहाय्यक प्रियंका सूर्यवंशी यांना शिवीगाळ केल्याच्या अनुषंगाने अमळनेर तालुका महसूल कर्मचारी संघटनेने प्रांताधिकार्‍यांना निवेदन दिले आहे. यात म्हटले आहे की, ३१ डिसेंबरला दुपारी ४.१५ वाजता येथील तहसील कार्यालयातील संजय गांधी योजना शाखेच्या कार्यालयात महसूल सहाय्यक प्रियंका सूर्यवंशी या कार्यालयीन कामकाज करत असताना एक लाभार्थी संजय गांधी योजनेच्या पगारासंदर्भात विचारणा करण्यासाठी आला होता. या लाभार्थ्याला संजय गांधी योजनेसंदर्भात त्यांनी योग्य ती माहिती पुरवली होती. त्यानंतर हा व्यक्ती कार्यालयातून बाहेर गेला. त्यानंतर हा लाभार्थी गलवाडे रोडवरील संदीप युवराज पाटील यांना संजय गांधी योजनेच्या शाखेत घेऊन आला. त्यानंतर संदीप पाटील यांनी प्रियंका सूर्यवंशी यांना अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ करत धमकी दिली. तसेच तहसील कार्यालयातील अधिकारी व इतर कर्मचार्‍यांना ही दमदाटी केली. कार्यालयातील महिला कर्मचार्‍यांविरुद्ध अर्वाच्य भाषेत वर्तणूक केल्याच्या निषेधार्थ महसूल कर्मचारी संघटनेने संदीप पाटीलचा जाहीर निषेध केला. तसेच संदीप पाटील याच्याविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल करण्याकरिता पोलिस निरीक्षकांना आदेश व्हावेत व संबंधित व्यक्तीस तहसील कार्यालयाच्या आवारात येण्यास मज्जाव करावा, अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.

दरम्यान, संबंधित व्यक्तीविरुद्ध कारवाई होईपर्यंत अमळनेर तालुका महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने कामबंद आंदोलन पुकारण्यात येत असल्याचे पत्रात म्हटले आहे. या प्रकरणाचा निषेध करण्यात येत असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Protected Content