थेट कंपन्यांकडून राज्य सरकार रेमडेसिवीर खरेदी करणार

 

जालना : वृत्तसंस्था । रेमडेसिवीर इंजेक्शन उत्पादक सात कंपन्यांकडून निविदा पद्धतीनं हाफकीन कंपनी सरकारच्या वतीने खरेदी करून शासकीय रुग्णालयांना पुरवठा करेल.प्रत्येक जिल्ह्यात एक स्टॉकिस्ट असेल , त्याला या इंजेक्शनचा पुरवठा केला  जाईल ,” अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

 

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उपद्रव झाल्यानंतर मोठ्या संख्येनं रुग्णवाढ झाली. त्यामुळे बेड, व्हेंटिलेटर, आयसीयू बेडबरोबरच रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यातच काळाबाजारात इंजेक्शनची विक्री होत असल्याचे अनेक प्रकार राज्यात उघडकीस आले. त्यानंतर राज्य सरकारने रेमडेसिवीरचा काळाबाजार रोखण्यासाठी दोन पद्धतीनी रेमडेसिवीर वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

 

राजेश टोपे यांच्या हस्ते जालन्यात खासगी कोविड रुग्णालयांना दहा हजार रेमडेसिवीर इंजेक्शनचं वाटप करण्यात आलं. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

 

“जिल्हाधिकारी खासगी रुग्णालयांची इंजेक्शनची गरज लक्षात घेऊन इंजेक्शनचा पुरवठा करतील. या वाटपावर जिल्हाधिकाऱ्यांचं नियंत्रण असल्यानं काळाबाजार होणार नाही. यातून खासगी रुग्णालयांना सहज रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होईल. रेमडेसिवीर इंजेक्शनचा टास्क फोर्सने सांगितल्याप्रमाणे योग्य पध्दतीने वापर केल्यास इंजेक्शनचा तुटवडा भासणार नाही,” असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.

 

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राने ऑक्सिजन पुरवठा करावा अशी मागणी केली आहे. मात्र कोणतंही राज्य यासंदर्भात मदत करायला तयार नसून, आपक्याकडे उपलब्ध असलेला ऑक्सिजनची गळती थांबवून त्याचा चांगल्या पद्धतीने वापर करावा लागेल हाच मार्ग आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या ब्रेक द चैन संदर्भातील आवाहनाला सर्वांनी घरी राहून सहकार्य करावं,” असंही टोपे म्हणाले. “सध्या ऑक्सिजनची कमतरता असून जालन्यातील घनसावंगी येथे येत्या १५ दिवसांत हवेतील पूर्ण ऑक्सिजन शोषून घेणारा प्लांट उभारत असून यात यश मिळालं तर संपूर्ण राज्यात असे प्लांट उभे करता येतील आणि लिक्विड ऑक्सिजनला पर्याय मिळेल,” अशी माहिती टोपे यांनी दिली.

Protected Content