मला हिंदूह्रदयसम्राट म्हणू नका – राज ठाकरेंची सूचना

raj thakre

मुंबई, वृत्तसंस्था | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मला हिंदूह्रदयसम्राट म्हणू नका, अशी सूचना पदाधिकाऱ्यांना केली आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आज आयोजित करण्यात आली होती. रंगशारदा येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला राज ठाकरे मार्गदर्शन करणार होते. मात्र राज ठाकरे १० मिनिटांतच बैठकीतून निघून गेल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. दरम्यान राज ठाकरे यांची तब्येत ठीक नसल्याने ते बैठकीतून निघून गेल्याचे सांगण्यात येत आहे.

मनसेतर्फ ९ फेब्रुवारीला सुधारित नागरिकत्व कायद्याच्या (सीएए) समर्थनार्थ मोर्चाची दिशा ठरवण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शॅडो कॅबिनेट, सीएए मुद्द्यांवर चर्चा होणार होती. राज ठाकरे बैठकीसाठी हजर राहिले होते. यावेळी राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना आपल्याला हिंदूह्रदयसम्राट संबोधू नका अशा सूचना केल्या. पक्षाचे पहिले महाअधिवेशन पार पडल्यानंतर अनेकांनी राज ठाकरे यांचा हिंदूह्रदयसम्राट असा उल्लेख केला होता. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी ही सूचना केली. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदूह्रदयसम्राट असा उल्लेख केला जातो. राज ठाकरे बैठकीत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील अशी अपेक्षा होती. पण १० मिनिटांतच राज ठाकरे बैठकीतून निघून गेले. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, थ्रोट इन्फेक्शन झाले असल्याने तसेच डॉक्टरांकडे जायचे असल्याने राज ठाकरे लवकर बैठकीतून निघून गेले. जाण्याआधी त्यांनी पक्षाच्या नेत्यांना व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्याच्या सूचना केल्या. तसेच ९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभुमीवर सर्व तयारी करण्याचा आदेश दिला आहे.

Protected Content