मराठा समाज मंडळातर्फे शिवजयंतीनिमित्त अभिवाचन स्पर्धा

 

भुसावळ प्रतिनिधी । येथील मराठा समाज मंडळ भुसावळातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवछत्रपती अभिवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. इयत्ता चौथीच्या शिवछत्रपती या पाठ्यपुस्तकाचे स्पर्धेत अभिवाचन होणार आहे.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती १९ फेब्रुवारीचे औचित्य साधून मराठा समाज मंडळ भुसावळ शहर व तालुकातर्फे शिवछत्रपती अभिवाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. प्रथम गट पाचवी ते आठवी असून द्वितीय गट नववी ते बारावी आहे. ही स्पर्धा १६ फेब्रुवारीला सकाळी ८ वाजता म्युनिसिपल हायस्कूल, जामनेर रोड, भुसावळ येथे होईल. शिवछत्रपती या पाठ्यपुस्तकातील कोणत्याही एका पाठाची निवड करावी. एका विद्यार्थ्याला एका पाठाचे अभिवाचन पूर्ण होईपर्यंत वेळ दिला जाईल. प्रत्येक गटातील तीन विजेत्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येईल. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळेल. छत्रपती शिवाजी महाराज जयंती समारंभ १९ फेब्रुवारी रोजी होईल, त्यावेळी बक्षीस वितरण केले जाईल. शहर व तालुक्यातील शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकांनी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित करावे, असे आवाहन मराठा समाज अध्यक्ष किरण पाटील व गटशिक्षणाधिकारी तुषार प्रधान यांनी केले आहे.

Protected Content