मराठा विचार मंथन बैठकीचे दोन्ही राजेंनी स्वीकारले निमंत्रण

 

सातारा, वृत्तसंस्था । शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी आज थेट साताऱ्यात जाऊन खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना ३ ऑक्टोबरला पुण्यात होणाऱ्या मराठा विचार मंथन बैठकीचे निमंत्रण दिले.

विनायक मेटे यांच्यासोबत दोन्ही राजेंनी मराठा समाजाच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी दोन्ही राजेंनी या बैठकीला उपस्थितीचं आश्वासन दिलं आहे. या भेटीनंतर बोलत असताना विनायक मेटे म्हणाले, “मराठा आरक्षणाबाबत समाजामध्ये जो संभ्रम निर्माण झाला आहे आणि आरक्षणाबाबत दिशा ठरवण्यासाठी आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांना मराठा विचारमंथन बैठकीचे निमंत्रण दिले. त्यांनी या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी मराठा समाजाला या बैठकीत दिशा देण्याचे काम त्यांनी करावे असं आवाहन केल्यानंतर दोघांनी ही याबाबत संमती दर्शवल्याची माहिती विनायक मेटे यांनी दिली.

या भेटीबाबत खासदार उदयनराजे म्हणाले, “मराठा समाजाने कधीही कुणाचे आरक्षण मागितले नाही. स्वतःच्या हक्काच्या आरक्षणाची मागणी केली आहे. 3 ऑक्टोबरला होणाऱ्या बैठकीसाठी मी स्वतः उपस्थित राहणार आहे. नेतृत्व कुणी करावे हे महत्वाचे नाही, तर मराठा समाजाला आरक्षण मिळणे हे महत्वाचे आहे.” या प्रश्नांची दखल कुणी घेतली नाही आणि जर उद्रेक झाला, तर याला जबाबदार कोण? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.

आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, “मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. याबाबत सर्वांनी एकत्र येऊन सरकारवर दबाव आणायला हवा. यासाठी संघटित लढा देण्याचे काम येत्या 3 ऑक्टोबरला पुण्यामधील बैठकीत होणार आहे. या बैठकीला मी स्वतः उपस्थित राहणार असून जो निर्णय समाज घेईल त्या निर्णयाबरोबर मी असेन.”

Protected Content