मन्यारखेडा शिवारात तरूणावर बिबट्याचा हल्ला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  तालुक्यातील मन्यारखेडा शिवारात भावासोबत सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या तरूणावर बिबट्याने अचानक हल्ला केला.  मात्र हल्ल्याची चाहूल लागताच गळ्यावर बिबट्याने पंजे मारताच पूर्ण ताकद एकवटून तरुणाने बिबट्याला अंगावरूनच थेट बाजूला फेकले. तसेच आरडाओरडा करू लागला. त्यामुळे हादरलेल्य्या बिबट्याने जंगलात पळ काढला. तरुणाने समयसूचकता दाखविल्याने ‘काळ आला होता, वेळ आली नव्हती’ अशी ही घटना जळगाव तालुक्यात मन्यारखेडा येथे घडली.

 

मदन सुखदेव अहिरे (वय २५, रा. मन्यारखेडा ता. जळगाव) असे जखमी तरुणाचे नाव आहे. जळगाव तालुक्यातील मन्यारखेडा गावात परिवारासह तो राहतो. त्याचा मोठा भाऊ राजेंद्र सुकदेव अहिरे (वय २८) हा त्याला गावापासून २ किलोमीटर अंतरावर असलेल्या रानात रविवारी ३० एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता सरपण गोळा करायला गेला होता. त्यावेळी राजेंद्र हा थोडा पुढे होता. तर मदन मागे राहून लाकडे गोळा करीत होता. त्यावेळी अचानक झाडीत दबा धरून बसलेल्या बिबट्याने मदनवर हल्ला केला. मात्र हल्ल्याची चाहूल लागताच मदनने बिबट्याला पूर्ण ताकद लावून बाजूला फेकले.

 

या प्रयत्नांत मदनच्या गळ्यावर व उजव्या कानाला बिबट्याने पंजे मारले होते. रक्तबंबाळ झाल्यावरही मदनने हिम्मत ठेऊन आरडाओरडा  करून भावाला आवाज दिला. त्यामुळे बिबट्या जंगलात पळून गेला. भाऊ राजेंद्रने धाव घेत जखमी भाऊ मदनला उचलत नागरिकांच्या मदतीने त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी आणले. त्याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याच्यावर उपचार सुरु केले. मदनच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात एकच गर्दी केली होती. दरम्यान, बिबट्याच्या हल्ल्यामुळे ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे.

Protected Content