जळगाव प्रतिनिधी । कृषी उत्पन्न बाजार समितीजवळील हॉटेल कस्तूरीसमोर कटलरी विक्रेत्यासह त्यांच्या मुलाला पावतीचे पैसे देण्यावरून महानगरपालिका वसुली ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांकडून दगडाने मारहाण केल्याची घटना आज सकाळी घडली.
जखमी हातगाडी विक्रेत्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.
पंढरी हिरागीर गोसावी (वय-५८ , रा. मंगलपुरी नगर, रामेश्वर कॉलनी जळगाव ) हे कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील हॉटेल कस्तूरीजवळ हातगाडीवर कटलरी दुकान लावून विक्री करतात. त्यांच्या कामात त्यांना त्यांचा मुलगा ईश्वर हिरागीर गोसावी हा देखील मदत करतो. नेहमीप्रमाणे बाप आणि मुलगा यांनी आज सकाळी १० वाजेच्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर हातगाडीचे दुकान लावले होते. महानगरपालिकेच्या वसूलीचे काम करणारे ठेकेदाराचे कर्मचारी संतोष कोळी (पुर्ण नाव माहित नाही) आणि पवन परदेशी हे दुकानावर आले. महापालिकेची २० रूपयाची पावती देवून पैसे मागितले. त्यावर पंढरी गोसावी यांनी ‘तुम्ही फिरून या, मी तुम्हाला पैसे देतो,’ असे सांगितले. त्यांनी असे सांगताच वसुली कर्मचाऱ्यांनि जबरी पैसे काढून घेत मारहाण करण्यास सुरूवात केली. वडीलांना दोन जण मारत असल्याचे पाहून मुलगा ईश्वर गोसावी हा सोडवत असतांना त्याला देखील मारहाण केली गेली .
महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यानी हातगाडी विक्रेते आणि हॉकर्सधारकांकडून सायंकाळच्या वेळी पावतीनुसार पैसे वसूली केली जाते. दरम्यान सकाळी हातगाडी विक्रेते किंवा हॉकर्सधारक दुकान लावतात परंतू सकाळी मालाची विक्री होत नसेल तर पैशांची अडचण येते यात ठेकेदारीने काम करणारे कर्मचारी धमकी व मारहाण करून जबरदस्ती पैसे वसूल करत असल्याची तक्रार पंढरी गोसावी यांनी केली आहे