मनपाच्या कोविड केअर सेंटर, विलगीकरण कक्षाला सर्वपक्षीय नगरसेवक देणार भेट !

जळगाव (प्रतिनिधी) शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात मनपा प्रशासनाकडून कोविड केअर सेंटर आणि विलगीकरण कक्ष उभारण्यात आला आहे. रुग्णांना मिळणारी सोयसुविधा योग्यप्रकारे आहे की नाही याची पाहणी करण्यासाठी उद्या दि.९ पासून सर्वपक्षीय नगरसेवक त्याठिकाणी भेट देणार आहेत. महापौर भारतीताई सोनवणे यांनी याबाबत बुधवारी मनपात गटनेत्यांसोबत बैठक घेतली.

 

महापौरांच्या दालनात झालेल्या बैठकीला भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती ऍड.शुचिता हाडा, नगरसेवक कैलास सोनवणे, भगत बालाणी, विशाल त्रिपाठी, बंटी जोशी आदी उपस्थित होते. जळगाव शहरातील कोरोना रुग्ण आणि त्यांच्या संपर्कातील व्यक्तींसाठी मनपा प्रशासनाकडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहात व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सोयसुविधांची सुरुवातीपासून महापौर सौ.भारती सोनवणे फोनद्वारे माहिती घेत आहे. मनपाचे कर्मचारी दिवसरात्र मेहनत घेत असून एखाद्या दिवशी कामाचा ताळमेळ चुकत असतो. रुग्णांना योग्य सुविधा मिळावी यासाठी त्याठिकाणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याची बाब महापौर सौ.भारती सोनवणे यांनी मांडली. सर्वपक्षीय गटनेत्यांनी देखील त्यास संमती दिली असून उद्या दि.९ जुलै पासून दररोज दिवसातून २ ते ३ वेळा विलगीकरण कक्षाला भेट देणार आहे. त्याठिकाणी रुग्णांना फोन करून माहिती घेतली जाणार असून त्यानंतर संबंधितांना विचारणा करत तात्काळ उपाययोजना केल्या जाणार आहेत.

Protected Content