मथूरा आणि काशीबाबतही कायदा करावा : तोगडिया

जौनपूर वृत्तसंस्था | आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया  यांनी  तीन तलाकसंदर्भात कायद्याप्रमाणेच मथुरा आणि काशीच्या संदर्भात कायदा करावा अशी मागणी केली आहे.

 

प्रवीण तोगडिया यांनी आज जौनपूर येथील शारदा शक्तिपीठाचे दर्शन घेतले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, उत्तर प्रदेशमध्ये भाजप सत्तेत आहे. देशात तीन तलाकच्या संदर्भात कायदा मंजूर करण्यात आला. तसाच मथुरा आणि काशीसाठीही कायदा करायला हवा. देश आणि मंदिरे तोडणार्‍या जिहादींना कठोर शिक्षा व्हायला हवी.  केंद्रातील मोदी सरकारने संसदेत  मथुरा आणि काशीसंदर्भात कायदा करून काशी विश्वनाथचा सन्मान करावा. असे केल्यास भाजपला आगामी उत्तर प्रदेश निवडणुकीत त्याचा फायदा होईल, असा विश्वास तोगडिया यांनी व्यक्त केला.

दरम्यान, अयोध्येत बांधण्यात येत असलेल्या भव्य राम मंदिराबाबत प्रवीण तोगडिया यांनी समाधान व्यक्त केले. हिंदूंच्या मोठ्या संघर्षानंतर राम मंदिर आता तयार होत आहे. ही अतिशय आनंदाची बाब आहे. मंदिर तयार होत आहे, हे पाहून समाधान मिळत आहे, असेही तोगडिया म्हणाले.  राम मंदिर निर्माण करण्यासाठी जसे अभियान राबवण्यात आले. तसेच आता गरिबी मुक्त भारतसाठी विशेष अभियान राबवणे आवश्यक आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.

Protected Content