. . .मग आधीच भाजपसोबत बोलण्या का केल्या ? : अजितदादांचा हल्लाबोल

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आज आम्हाला भाजपसोबत जाण्यावरून टिका करणार्‍यांनी आधी तीनदा भाजपशी बोलणी का केली होती ? असा सवाल करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले काका शरद पवार यांच्यावर जोरदार टिकास्त्र सोडले.

 

आज राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या बैठकी पार पडल्या. यात पहिल्यांदा अजितदादा पवार यांनी आपल्या भाषणातून शरद पवार यांच्यावर घणाघाती टिका केली. ते म्हणाले की, २०१४मध्ये प्रफुल्लभाईंचं शरद पवारांशी बोलणं झालं. नंतर प्रफुल्लभाईनी जाहीर केलं की आम्ही बाहेरून भाजपाला पाठिंबा देतो. आम्ही गप्प बसलो. का? तर नेत्यांनी निर्णय. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. आम्हाला सांगितलं की सगळ्यांनी वानखेडेला शपथविधीला जा. यानुसार आम्ही गेलो होतो. तेव्हा भाजप तुम्हाला का चालत होता ? असे अजित पवार म्हणाले.

 

 

यानंतर अजित पवार म्हणाले की, २०१७ साली देखील भारतीय जनता पक्षासोबत सत्तेत सहभागी होण्याबाबत चर्चा करण्यात आली होती. या बैठकीला आपल्यासह सुनील तटकरे, जयंत पाटील आणि अजून एक असे चार जण होतो. तर भाजपतर्फे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, चंद्रकांत पाटील हे चौघं होते. कुठली खाती, कुठले पालकमंत्रीपदं हे सगळं ठरलं होतं. यानंतर मात्र भाजपचे पवित्रा बदलून टाकतांना २५ वर्षांचा आमचा मित्रपक्ष असणार्‍या शिवसेनेला आम्ही सोडणार नसल्याचा पवित्रा घेतला. यावरून तेव्हाची बोलणी फिसकटल्याचे अजित पवार म्हणाले.

 

दरम्यान, यावेळी २०१९ साली घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीआधी घडलेल्या घडामोडींवरही अजित पवारांनी यावेळी भाष्य केलं. ते म्हणाले की, २०१९ सालच्या निवडणुकीनंतर मला आणि देवेंद्रला आपल्या नेत्यांनी सांगितलं की कुठे बोलायचं नाही. मग मी का बोलेन कुठे? नंतर अचानक बदल झाला आणि सांगितलं की आपण शिवसेनेबरोबर जायचंय. मला सांगा, २०१७ला शिवसेना जातीवादी असल्याचं सांगत त्यांच्याबरोबर जायचं नाही असं म्हटलं. मग असा काय चमत्कार झाला की दोन वर्षांनी शिवसेना मित्रपक्ष झाला? ज्या भाजपाबरोबर जायच होतं तो जातीवादी कसा झाला? असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला.

Protected Content