भुसावळ न . प . ची नियोजित सभा रद्द करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

 

 

भुसावळ : प्रतिनिधी । येथील नगरपरिषदेची शुक्रवारी होणारी सर्वसाधारण सभा बेकायदेशीर ठरवून रद्द करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दुर्गेश ठाकूर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे

 

यासंदर्भात  प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दुर्गेश ठाकूर यांनी म्हटले आहे की ,  १६ जुलैरोजी नगरपालिकेने व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे सर्वसाधारण सभेचे आयोजन केलेले आहे. ही सभा ७ महिन्यानंतर घेण्यात येत आहे. नियमाप्रमाणे दोन महिन्यानंतर सभा घेणे अनिवार्य आहे मात्र नगराध्यक्ष, मुख्याधिकारी  मनमानी पध्दतीने कामकाज चालवून सामान्य जनतेला वेठीस धरत आहे. या सभेच्या अजेंडयामध्ये ३१७ विषय नमुद  आहे. प्रत्येक विषय मांडण्यासाठी व चर्चा करण्यासाठी किमान २० मिनिटे गरजेचे आहे मात्र मागिल मिटींगाच्या अनुभवावरुन संपूर्ण सभा एक तासाच्या आत सर्व विषय मंजुर करुन संपविण्यात येते.

 

अजेंडयामध्ये मांडण्यात आलेले काही विषय  बेकायदेशीर आहे. काही वाडांमध्ये अगोदरच रस्ते व गटारीचे व सार्वजनिक जागेचे संरक्षक भिंतीची कामे करण्यात आलेली आहे.  फक्त स्वतःची बिले मंजुर करुन घेण्यासाठी हे विषय अजेंडयामध्ये नमुद करण्यात आले आहे.

 

शहरामध्ये सुरु असलेली रस्त्यांची कामे निकृष्ठ दर्जाची असून तयार  रस्त्यांवर पावसामुळे खड्डे पडण्यास सुरुवात झालेली आहे.  नगराध्यक्ष व मुख्याधिकारी संगनमत करुन जनतेच्या पैशांची लुट करीत आहे गरीब जनतेच्या जिवाशी खेळत आहे. अनेकदा तक्रारी देवूनसुध्दा कोणतीही कारवाई किंवा चौकशी नगरपरिषदेमार्फत न झाल्याने नाईलाजास्तव हा  अर्ज देणे भाग झालेले आहे.   रस्त्यांची कामे त्वरीत थांबवून चौकशी करण्यात यावी.

 

शहरामध्ये अमृत योजनेच्या पाईपलाईनचे काम पुर्ण झाले नसून निव्वळ स्वतःच्या आर्थीक फायदयासाठी रस्ते करण्याचा घाट घातला जात आहे. प्रत्यक्ष नळ कनेक्शन करतेवेळी पुन्हा रस्त्यांचे खोदकाम करावे लागणार आहे. ही बाब माहित असूनसुध्दा रस्ते पुर्ण करण्याचा घाट नगरपालिका प्रशासन घालत आहे  प्रस्तावित सभेमध्ये विरोधकांच्या वार्डातील विकास कामासंबंधात एकही विषय मांडण्यात आलेला नाही.  नगराध्यक्ष सुडाच्या भावनेने

राजकारण करीत  आहेत .

 

शहरात दुषित व अनियमित पाणीपुरवठा होत आहे यामुळे साथीचे आजार वाढत असून नागरिक त्रस्त आहेत . त्यामुळे स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा करण्याचे आदेश नगरपालिका प्रशासनास तातडीने देण्यात यावे. नियोजित  सर्वसाधारण सभा तहकुब करावी  अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही याची नोंद घ्यावी, असेही राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दुर्गेश ठाकूर यांनी या निवेदनात नमूद केले आहे .

 

 

Protected Content