भुसावळात घरफोडी करणारे दोन अटकेत; तीन फरार

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील रजा नगरात राहणाऱ्या डॉक्टरसह त्याचे कुटुंब कोवीड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असतांना अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून घरातील १० लाख ९० हजाराचा ऐवज लंपास केल्याची घटना १ जून रोजी उघडकीस आली. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. या गुन्ह्यातील दोघांना अटक केली असून तीन जण फरार आहे.

अशी आहे घटना
याबाबत माहिती अशी की, शहरातील खुशतर हाऊस रजा नगरात राहणारे डॉक्टरासह कुटुंबातील सर्व सदस्य कोवीड केअर सेंटरमध्ये २४ मे ते १ जून पर्यंत क्वारंटाईन झाले होते. त्यामुळे घराला कुलूप लावून सील करण्यात आले होते. याचा फायदा अज्ञात चोरट्यांनी या कालावधील घराच्या बेडरूमच्या खिडकीचे ग्रिल उचकावून घरात प्रवेश करत ४ लाख रूपये किंमतीचे सोन्याचांदीचे दागीने व इतर वस्तू असा एकुण १० लाख ९० हजार ९०० रूपयांचा मुद्देमाल लंपास केला होत. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात भाग-५, गुरनं ५८८/२०२० भादवी ३८०, ४५४, ४५७ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला होता.

तपासासाठी पथक रवाना
गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, विभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पो.नि. बापु रोहम व भुसावळ बाजार पेठ पोलीस स्टेशनचे पो.नि. दिलीप भागवत यांनी एलसीबीचे पथक तयार केले. त्यात स.फौ. राजेंद्र पाटील, पोहेकॉ. अनिल इंगळे, रमेश चौधरी, युनूस शेख, संतोष मायकल, रणजित जाधव, पोहेकॉ राजेंद्र पवार यांना भुसावळ येथे रवाना केले होते.

सापळा रचून केले अटक
स्थानिक गुन्हे शाखेच्या पाथकाला गोपनिय माहितीनुसार घरफोडी करणारे संशयित आरोपी आकाश सुरेश मोरे (वय-२५)रा. घोडे पीर नगर आणि शेख मेहबुब शेख इमाम (वय-६०) रा. दिन दयाळ नगर यांना अटक केली. दरम्यान रजा नगरातील केलेली घरफोडीची कबुली दिली आहे. गुन्ह्यात वापरलेली स्कुटी दुचाकी आणि २ लाख ८६ हजार ४०० रूपये हस्तगत केले आहे. दरम्यान घरफोडीत सहभागी असलेले साथीदारअनिस शेख रशीद रा. जाम मोहल्ला, भुसावळ, अल्तमस शेख रशिद रा. जाम मोहल्ला, भुसावळ, जहीर (पुर्ण नाव माहिती नाही) रा. मुस्लिम कॉलनी, भुसावळ हे तिघे फरार आहेत. पुढील कारवाईसाठी संबंधित दोन्ही आरोपींना भुसावळ बाजारपेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Protected Content